अनैतिक संबधास अडसर ठरल्याने पत्नीने केला खून : पत्नीसह मावस दीर पोलिसांच्या ताब्यात, भूम तालुक्यातील घटना
वाशी (जि. धाराशिव) Dharashiv Husband Murder Case : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीवर चाकूने सपासप वार करत दगडाने डोके ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना भूम तालुक्यातील रामकुंड शिवारातील वाकवड तलावाजवळ गुरुवारी (दि. १९) दुपारी घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी पत्नीसह मावस दिरास ताब्यात घेतले आहे. गोविंद शिवाजी कागदे (२७, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मयताचे नाव आहे.
गोलेगाव येथील रहिवासी गोविंद कागदेचा विवाह तांदूळवाडी (ता. वाशी) येथील बाळासाहेब चौधरी यांची कन्या अंजली हिच्याशी ६ महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नापूर्वीच अंजलीच्या आत्याचा मुलगा शुभम सुभाष खोसे (२६, रा. चांदवड, ता.भूम) याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र, अंजलीच्या वडिलांनी त्यांचा दुसरा भाचा गोविंदसोबत मुलीच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिला होता. लग्नानंतरही शुभम व अंजलीचे प्रेमसंबंध सुरूच होते. या प्रेमसंबंधास गोविंद अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून गोविंदचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गोविंदला फोन करून कुंथलगिरी घाटाजवळील रामकुंड शिवारातील वाकवड तलावाजवळ डोंगराळ भागात बोलावून घेतले. तेथे त्यांनी त्यास दारू पाजली. चर्चा सुरू असताना त्यांची बाचाबाची झाली. दोघांनी मिळून गोविंदच्या गळ्याजवळ व छातीवर चाकूने सपासप वार केले. नंतर दगडाने डोके ठेचून खून केला.
गुराख्याने ओरडण्याचा आवाज ऐकल्याने फुटले बिंग
गोविंदच्या ओरडण्याचा आवाज बाजूच्या दरीत जनावरे चारणाऱ्या एका गुराख्याने ऐकला. दोघेजण मिळून एकास मारत असल्याचे पाहिले. ही बाब वाकवड येथील मारकड नावाच्या व्यक्तीस फोन करून सांगितली. त्यावरून मारकड यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शिंदे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून मयताचा मावस भाऊ शुभम खोसे व पत्नी अंजलीने जंगलात पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या अर्ध्या तासात दोघांना ताब्यात घेतले.
Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.