किमान शिल्लक २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर; अंतिम पैसे काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदत
आता दरमहा ‘पगार’ मिळणार, प्रतीक्षा कालावधीही घटला!
नवी दिल्ली : EPFO New PF Withdrawal Rules 2026 देशातील कोट्यवधी नोकरदार आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने गुरुवारी ऐतिहासिक आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या २४० व्या बैठकीत पीएफ पैसे काढण्याचे नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले. यानुसार, निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आता संपूर्ण रक्कम एकदम न काढता ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’द्वारे मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये पैसे घेता येणार आहेत. तसेच, पीएफ खात्यातील किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांवर आणण्यात आली असून, अंतिम सेटलमेंटसाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून अवघ्या २ महिन्यांवर आणला आहे.
दावे निकाली काढण्याचा वेग वाढला
ईपीएफओच्या ‘सीआयटीईएस २.०’ या आधुनिक प्रणालीमुळे आता ७१ टक्के दावे स्वयंचलित पद्धतीने निकाली निघत आहेत. दावे फेटाळण्याचे प्रमाण २३ टक्क्यांवरून ७.८२ टक्क्यांवर आले असून, पैसे मिळण्याचा कालावधी ११ दिवसांवरून अवघ्या २.५७ दिवसांवर आला आहे. याशिवाय, विमा योजनेतील (ईडीएलआय) प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी कंपन्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
झटपट पैसे आणि जास्त तरलता
नोकरी सोडल्यानंतर अंतिम पैसे काढण्यासाठी आता वर्षभर वाट पाहावी लागणार नाही, दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच खात्यात केवळ १० टक्के रक्कम शिल्लक ठेवून बाकीचे पैसे काढता येतील. ऐच्छिक योगदान व टिप्स जमा करण्याची सोय: पारंपरिक पगार प्रणालीशिवाय युएएन संलग्न पद्धतीने स्वत:हून अतिरिक्त पैसे किंवा ग्राहकांकडून मिळणारी ‘टिप’ थेट पीएफमध्ये जमा करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न
‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ सुविधेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा रकमेतून नियमित हप्ते मिळतील आणि खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर व्याजही सुरूच राहील. ही योजना ऐच्छिक असेल. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षांवरील आणि खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या सुमारे ६.३२ लाख सदस्यांना याचा थेट लाभ मिळेल. सदस्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला उर्वरित रक्कम एकरकमी किंवा हप्त्यात घेण्याचा पर्याय असेल.
Read About : Maharashtra Wage Rules – राज्यात ‘महाराष्ट्र वेतन नियम, 2026’ लागू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.