Pitrivadh Book Review : ‘पितृवध’ हे हिंदीतले युवा समीक्षक, संपादक आशुतोष भारद्वाज यांचे पुस्तक वाचले त्याला चार-पाच वर्ष झाली. त्यावर तेव्हा एक छोटे टिपणही समाजमाध्यमांवर लिहिले होते. पण, अलीकडेच अज्ञेय आणि अविनाश मिश्र यांचा चार खंडातला शेखर वाचताना ते पुन्हा उघडणे अपरिहार्य होते. या पुस्तकात त्यांनी ‘शेखर एक जीवनी’च्या संदर्भात ‘अज्ञेय और मैं’ असा दीर्घलेख लिहिला आहे. त्यावर लिहिण्याआधी कुठल्याही सर्जनासंदर्भात आशुतोष मांडतात ती ‘पितृवध’ ही विलक्षण संकल्पना समजून घ्यायला हवी.
साहित्यात उमेदवारी करणाऱ्या नवलेखकांसाठी अभिजात, आपण कालजयी म्हणतो त्या साहित्याचे मोठे लेखक आदर्श असतात, ज्यावर आपल्याला चालायचे आहे ती वाट दाखवणारे दीपस्तंभ जसे. पण, सृजनशील मोठेपणाला कालसंदर्भ असतो, त्याचे भान सुटले तर अशा मोठेपणाचे ओझे वाहता वाहता आपल्यातली सर्जनाची भूमी बंदिस्त, कोंदट होत जाते. आपली वाट पायवाट असेल तरी ती आपली आपण शोधलेली हवी हे कळणे एका वळणावर महत्त्वाचे असते, त्यामुळे ज्या मोठ्या साहित्यिकांना आपण कृतज्ञतेचे अर्ध्य देत आलो आहोत, ज्यांचे ‘पितृऋण’ आपण कर्तव्य भावनेने फेडले पाहिजे असे वाटते, वास्तवात त्यांनीच (त्यांच्या प्रभावाने) आपल्यातल्या वाहत्या उर्जेला कैद केले आहे, याची जाणीव कुणाही सजग युवा साहित्यिकाला होते तो क्षण असहनीय, पण त्याच्या मुक्तियात्रेचा प्रारंभ क्षण असू शकतो. त्यानंतर त्याचा आपल्याशीच त्यापासून मुक्त होण्याचा संघर्ष सुरू होतो. या पुस्तकातले लेख या अशा संघर्षाच्या फैरी आहेत. लक्षात येते कागदावर अशा ‘पित्यां’चे शोकगीत लिहिल्याशिवाय लेखकाला ‘मुक्ती’ मिळत नाही.
महाभारतातील भीष्माचा (जरी त्याने तो स्वेच्छेने स्वीकारला तरी) मृत्यू हे ‘पितृ-वधा’चे विलक्षण उदाहरण आहे, असे आशुतोष म्हणतात. (धर्मार्जूनांचा मार्ग त्याने मोकळा केला याअर्थी) रवींद्रनाथ, अज्ञेय, श्रीकांत वर्मा, गजानन माधव मुक्तिबोध, अशोक वाजपेयी, निर्मल वर्मा, अनंतमूर्ती, अरुंधती रॉय अशा प्रस्थापित महानुभावांच्या साहित्याकडे वेगळ्या, स्वतंत्र, पूर्वप्रभावमुक्त दृष्टीनं पाहता येईल अशी मचाणं आशुतोष भारद्वाज यांनी यात बांधली आहेत. साहित्यकृतीचं मोठेपण मान्य करूनही लेखकाशी, त्याच्या लेखनाशी वाचनापलीकडे जोडलेलं असणं न नाकारता त्याच्या लेखनाची परखड चिकित्सा करणं आणि हे करत असताना स्वत:ही समीक्षेत उपस्थित असणं ही कसरत आहे. समीक्षेलाही सर्जक, वाचनीय बनवणारी कसरत. आशुतोष भारद्वाज यांनी ती साधली आहे. हे मूर्तिभंजन नव्हे, हा या सगळ्या महानुभावांच्या मोठेपणाला दिलेला नकारही नव्हे तर त्याचे ओझे उतरवत पाठीतून वाकलेला आपला कणा ताठ करणे आहे, नवे काही सामावून घेण्यासाठी दृष्टीत जागा निर्माण करणे आहे.
चार विभागातल्या या पुस्तकाचा विद्यापीठीय चर्चासत्रात वाचलेल्या तरी कमालीच्या संवादी, वाचनीय लेखांव्यतिरिक्त सर्जनासंबंधी दीर्घ मुलाखती, स्मृतिलेख, डायरीतली पानं असा सर्जक विस्तार आहे. ‘अज्ञेय और मैं’ हा यातला महत्त्वाचा लेख त्यांच्या ‘शेखर एक जीवनी’ या प्रसिद्ध कादंबरीसंदर्भातच आहे. अज्ञेयांच्या साहित्यिक मोठेपणाचा, साहित्याशी असलेल्या त्यांच्या अव्यभिचारी निष्ठेचा सन्मानपूर्वक उल्लेख करून आशुतोष म्हणतात, ‘..तरी त्यांच्या स्वत:बाबत कसलाच संशय नसणाऱ्या, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कसलाही संघर्ष करावा न लागलेल्या, सगळे गुण-क्षमता मिळवावे न लागता ‘घेऊनच’ जणू जन्माला आलेल्या शेखरशी मला माझ्या साहित्यासंदर्भात कसलेही नाते जोडता आले नाही.’ लेखक अगदी सहजपणे त्याला महानायक बनवतो, एखाद्या यानातून थेट शिखरावर उतरलेला महानायक. स्वत:ला कायम योग्यच मानणारा, कसलेही अपराधगंड नसलेला, व्यक्तिमत्त्वात कसलेच भणंगपण, गोंधळलेपण, अस्ताव्यस्तपण नसलेला सर्वगुणसंपन्न, आत्ममोहित नायक. आधुनिक कादंबरीकाराने आपल्या नायकाला असे जणू देवत्व वा बुद्धत्व देण्यापासून स्वत:ला आवरले पाहिजे, असे म्हणतात आशुतोष तेव्हा पटतेच ते.
कृष्णा सोबतींची यातली त्यांच्यावरील स्मृतिलेखात समाविष्ट असलेली, त्या जवळपास मृत्युशय्येवर असताना सुरू झालेली आणि त्यामुळेच अर्धवट राहिलेली मुलाखत हा अप्रतिम ऐवज आहे. ९२ व्या वर्षी ही बाई बिछान्यावरून बोलते. आशुतोष त्याचं वर्णन करताना लिहितात, ‘जूनमधल्या या दुपारी इस्पितळातल्या आपल्या पलंगावर त्या लेटलेल्या आहेत. चेहऱ्यावर ताज्या बर्फासारख्या सुरकुत्या, डोळ्यात पहिल्या पावसाची चमक, उर आणि उत्साहानं ओथंबलेला स्वर..’ पण त्यांचे बोलणे वेगात, अनेक दशकांच्या आठवणी वाक्यांमध्ये घुसतात, पूर्ण आयुष्य एकाच वाक्यात उतरवायला धडपडावे तशा.
खरं तर याला निमित्त आहे ते त्यांचा सात-आठ दशकांचा लेखकीय पसारा आवरण्याचे. कादंबऱ्यांचे खर्डे, हस्तलिखितं, पत्रं, डायऱ्या, चिठ्ठ्याचपाट्या..जाण्याची चाहूल लागलेली आहे. आयुष्यभर आपला एकांत, खासगीपण कसोशीनं त्याची किंमत मोजून जपलेली ही बाई. विद्यापीठानं जपण्यासाठी सगळं मागितलं आहे, तेव्हा आधी हयातीतच त्यातला नंतर गैरसमजाला, चर्चेला वाव देईल असा भाग काढून टाकायचा आहे. त्यातल्या हरएक कागदाशी जोडलेल्या स्मृती, बाईचं सगळं आयुष्य या संधिकाळात मनात रिवाइंड होत आहे. हे काम करता करता आशुतोष बोलताहेत. या विश्वासाचा किंचितही गैरफायदा न घेता लिहिलेला हा अख्खा लेख एक कादंबरी व्हावा असा ऐवज आहे.
नीतिन वैद्य
संपर्क : ९४०५२६९७१८
Read About : Nvidia CEO Resignation : ‘एनव्हिडिया’तील राजीनामा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.