विकास प्रकल्पांची गती आणि कृषी उत्पादकता वाढविण्यावर भर
मुंबई : Vadhavan Port Project – पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार लाहिरी यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, जमिनीचे योग्य व्यवस्थापन, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यादृष्टीने राज्य शासन विविध विकास प्रकल्पांची प्रभावी अमंलबजावणी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
विकासकामे निश्चित गतीने पूर्ण करणार
राज्याच्या विकास प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. अशोककुमार लाहिरी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नीती आयोगाचे आभार मानले. नीती आयोगाकडून राज्याला नेहमीच मार्गदर्शन आणि उपयुक्त सल्ले मिळत आले आहेत. यापुढेही आयोगाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील विकासकामे निश्चित गतीने पूर्ण करण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न
या बैठकीत जमीन अधिग्रहणाच्या दीर्घकालीन नियोजनावर विशेष भर देण्यात आला. जमीन अधिग्रहण, पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, असे सांगतानाच, जमिनीचा विकास आणि योग्य व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होऊ शकतो, असे डॉ. लाहिरी यांनी नमूद केले.
वाढवण बंदराच्या कामाबाबत चर्चा
भविष्यातील विकास प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे आगाऊ अधिग्रहण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आज कमी किमतीत उपलब्ध असलेली जमीन भविष्यात अधिक मौल्यवान ठरू शकते. त्यामुळे पुढील पिढ्यांचा विचार करून महत्वाकांक्षी जमीन अधिग्रहण धोरण आखण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वाढवण प्रकल्पाच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीत राज्याच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन, जमीन अधिग्रहण व व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.