पाच जिल्ह्यांसाठी १५८ कोटींचा आराखडा, तीन जिल्ह्यांना लागू शकतात ७० कोटी
छत्रपती संभाजीनगर Marathwada Drought Crisis : दुष्काळी परिस्थिीमुळे दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढत आहे. विभागातील आठपैकी पाच जिल्हे सध्या डेंजर झोनमध्ये आले असून या जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी जवळपास १५८ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन जिल्ह्यांना ५० ते ७० कोटींची गरज लागणार आहे. अशा प्रकारे यावर्षी दुष्काळी परिस्थितीशी तोंड देण्यासाठी मराठवाड्याला जवळपास २०० कोटींची गरज लागणार आहे.
विभागात यावर्षी सरासरी केवळ ६५ टक्केच पाऊस झाला आहे. तर ३५ टक्यांची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे विभागाची खरीप हंगामाची आनेवारी ५० टक्यांच्या खाली आली आहे. अत्याल्प पावसामुळे धरणांतील पाणीसाठाही फारच कमी आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातच टंँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने टंचाई कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यापैकी पाच जिल्ह्यांनी आपले आराखडे तयार करून पाठविले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी जिल्ह्यातील ४ हजार ७३९ गावांसाठी आराखडा तयार केला आहे.
त्यासाठी १५८ कोटी रुपये लागणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन झाल्यानंतर त्या जिल्ह्यांचेही आराखडे येत्या आठवड्यात तयार होतील, असे विभागीय प्रशासनाने सांगितले. जायकवाडी, विष्णूपुरी वगळता कोणत्याही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला आहे.
जिल्हा………योजनांची संख्या…….टंचाईग्रस्त गावे / वाड्या…………आवश्यक निधी
जालना…………….०९५४……………….. ७६१ / १४२……………………..३० कोटी
बीड………………..३४१०…………………१२६२ / ५५१……………………५४ कोटी
लातूर………………१३८७…………………५५१ / १८१……………………..१२ कोटी
धाराशिव…………..२४०४…………………७७८ / १८……………………….४२ कोटी
परभणी…………….१२७६…………………३५० / १४५…………………….२० कोटी
एकूण……………….९१२२………………..३७०२ / १०३७………………….१५८ कोटी
विभागात ७०६ टँकरने पाणीपुरवठा
मराठवाड्याचा हिवाळ्यातच टँकरवाडा होत असल्याची स्थिती आहे. विभागातील पाच जिल्ह्यांत पाणीटंचाई वाढली असून ४५० गावे आणि २८४ वाड्यांना ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विभागातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हे सध्या टँकरमुक्त आहेत. तर मराठवाड्याची राजधानीचे शहर छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक तहानले आहे. त्यापाठोपाठ जालना, परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये टँकरचा आकडा वाढत चालला आहे.
Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.