Ad Advertisement Ad Advertisement

Disability Certificate Reverification – दिव्यांग प्रमाणपत्रांवर प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’ – 2026

२०९ कर्मचाऱ्यांची होणार फेरतपासणी

छत्रपती संभाजीनगर: Disability Certificate Reverification – जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग प्रवर्गातील २०९ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची आणि वैश्विक दिव्यांग ओळखपत्रांची (युडीआयडी कार्ड) फेरतपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील दिव्यांग अपीलीय वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्तपासणी आणि पुनर्पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्व गटशिक्षणाधिकारी आणि पंचायत समित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना निश्चित केलेल्या दिनांक आणि वेळेनुसार वैद्यकीय मंडळासमोर उपस्थित राहण्याबाबत लेखी कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ व त्याअंतर्गत नियम २०१७ तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या विविध शासन निर्णयांच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.

शासनाच्या ६ मार्च २०२६ रोजीच्या निर्णयानुसार, संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने दिव्यांग प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी किंवा पुनर्पडताळणी करण्यासाठी प्रकरणे संदर्भित केल्यास ज्या संस्थेने मूळ प्रमाणपत्र निर्गमित केले आहे, त्या संस्थेच्या अपीलीय मंडळामार्फत त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुनर्तपासणीअंती अपीलीय मंडळाला संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्डमध्ये आवश्यक सुधारणा करणे, प्रमाणपत्र फेटाळणे किंवा नियमानुसार पुढील कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया

दिव्यांगत्व पडताळणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडील याचिका क्रमांक डब्ल्यूपी ८३४/२०२६ मध्ये ६ मे २०२६ रोजी निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयानुसार दिव्यांगत्वाच्या वैद्यकीय पुनर्मूल्यांकनासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या शासन निर्णयांनुसार विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करून अपीलीय वैद्यकीय मंडळामार्फत नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या अधिनस्त सर्व विभागांकडून दिव्यांग प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तसेच सेवेत रुजू झाल्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली.

या प्रक्रियेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांनी निर्गमित केलेली दिव्यांग प्रमाणपत्रे आणि युडीआयडी कार्ड असलेल्या एकूण २०९ कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. ही यादी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर दिव्यांग अपीलीय मंडळाने दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार तपासणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

एका दिवशी कमाल दहा कर्मचाऱ्यांची तपासणी

वैद्यकीय अधीक्षक तथा दिव्यांग अपीलीय मंडळाचे सदस्य सचिव यांनी दिलेल्या सूचनेनुसार, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या विभागात आणि निश्चित केलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे लागणार आहे. एका दिवशी संबंधित विभागाकडे कमाल दहा कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तपासणीसाठी येताना कर्मचाऱ्यांनी आपले मूळ दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वऊकऊ कार्ड आणि आवश्यक असलेली इतर सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

विभागप्रमुखांवर राहणार जबाबदारी

जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित गटशिक्षणाधिकारी आणि विभागप्रमुखांना त्यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना जोडलेल्या यादीतील निश्चित दिनांक आणि वारानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहण्याबाबत लेखी सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अचूक अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित संवर्ग नियंत्रण विभागप्रमुखांची राहणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रावर शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांची स्वाक्षरी असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयामुळे संबंधित २०९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय स्तरावर फेरपडताळणी होणार आहे.

Read About : Natural Childbirth Awareness Rally – नैसर्गिक प्रसूतीच्या महत्त्वाबाबत जनजागृतीसाठी निघाली पदयात्रा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.