Ad Advertisement Ad Advertisement

थकीत वेतनासाठी १.८० लाखांची लाच; कला शिक्षकास रंगेहात पकडले! – Art Teacher Bribe Case

परभणीत एसीबीची कारवाई; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही अटक, वरिष्ठांसाठी रक्कम स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न

परभणी : Art Teacher Bribe Case पत्नीचे थकीत वेतन अदा करण्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रतिनियुक्तीवरील कला शिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २६) सायंकाळी रंगेहात पकडले. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्तांचेही नाव समोर आले. वरिष्ठांसाठी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

शेख असलम शेख रज्जाक (कला शिक्षक) आणि डॉ. संदीप गोपाळराव घोन्सीकर अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात लिपिक म्हणून प्रतिनियुक्तीवर असलेले किशनराव वसेकर यांचाही या प्रकरणात सहभाग आहे.

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेल्या तक्रारदाराच्या पत्नी कल्पना कुंटूरकर या जिंतूर येथील विश्वकर्मा निवासी अस्थिव्यंग विद्यालयात कला शिक्षिका होत्या. त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते. मात्र, हे वेतन देण्यासाठी शेख असलमने १५ टक्के रकमेची लाच मागितल्याची तक्रार १७ नोव्हेंबर रोजी एसीबीकडे करण्यात आली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी जिंतूर येथील आठ कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी ७५ लाख ८६ हजार ८७० रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यापैकी सात कर्मचाऱ्यांचे वेतन अदा झाले; मात्र तक्रारदाराच्या पत्नीचे १२.४६ लाख रुपये रखडले होते.

याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७) पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

फोन केल्यानंतर घरी मागवले पैसे

एसीबीच्या पडताळणीत १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी निश्चित झाली. गुरुवारी बसस्थानक परिसरातील मिल ऑप्टिकलसमोर सापळा रचून शेख असलमला रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने ही रक्कम प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर फोनवरून पैसे कुठे आणून द्यायचे, अशी विचारणा केली असता घरी आणण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

Read About : नेरूळ एमआयडीसीत 20 कोटींच्या सोन्याची फिल्मी स्टाईलने लूट – 20 Crore Gold Robbery

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.