एआय पायाभूत सुविधांवरील प्रचंड भांडवली खर्चातून प्रत्यक्ष महसूल आणि नफा मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह; निओक्लाउड कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलसमोर आव्हाने
नवी दिल्ली : AI Investment Returns कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर होत असलेल्या प्रचंड भांडवली गुंतवणुकीसमोर आता वास्तवाची मोठी कसोटी उभी राहिली आहे. तंत्रज्ञान कंपन्यांना या मोठ्या खर्चातून अपेक्षित आणि शाश्वत परतावा मिळेल की नाही, याबाबत चिंता वाढली असून या क्षेत्रासाठी पुढील १८ महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असा इशारा जागतिक गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालात देण्यात आला आहे. डेटा सेंटर्स, कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रगत चिप्सवर टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र, या खर्चाचे रूपांतर प्रत्यक्ष महसूल आणि नफ्यात होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोशल कॅपिटलचे संस्थापक आणि सीईओ चमाथ पालिहापिटिया यांनी या गुंतवणूक चक्राच्या शाश्वततेवर भाष्य करताना सांगितले की, एआयचा वापर करणाऱ्या कंपन्या त्यातून ठोस आर्थिक परतावा मिळवू शकतात की नाही, यावर सर्व काही अवलंबून असेल. सध्या एआयमुळे नफ्यात वाढ झाल्याचे ठामपणे सांगू शकणाऱ्या कंपन्यांची संख्या जवळपास शून्य आहे. पुढील १८ महिने अत्यंत निर्णायक आहेत. या काळात अंतिम उत्तर मिळाले नाही तरी, शाश्वत एआय बिझनेस मॉडेल्स आणि तकलादू प्रकल्प यांतील फरक स्पष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे ते म्हणाले.
‘निओक्लाउड’ आणि वित्तपुरवठ्यापुढील आव्हाने
जीपीयू, वीज आणि डेटा सेंटर क्षमतेसाठी मोठी गुंतवणूक करणाऱ्या विशेष क्लाउड पुरवठादारांच्या (निओक्लाउड्स) व्यावसायिक मॉडेलबाबत अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ग्राहकांकडून मागणी स्थिर न राहिल्यास त्यांना दीर्घकालीन आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाऊ शकते.
गोल्डमन सॅक्सच्या लेव्हरेज्ड फायनान्स विभागाच्या प्रमुख मिरियम व्हीलर यांनी सांगितले की, गुंतवणूकदार आता प्रकल्पाचा दर्जा आणि भाडेकरूंची (टेनंट्स) विश्वासार्हता यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या १२ महिन्यांत हाय-यील्ड डेट मार्केटमध्ये एआय-संबंधित सुमारे ३० व्यवहार झाले, मात्र सप्टेंबर अखेरनंतर नवीन व्यवहारांना मोठी ओहोटी लागली आहे.
बड्या टेक कंपन्यांना दिलासा, पण…
भक्कम आर्थिक स्थिती आणि प्रस्थापित व्यवसायांमुळे मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी (हायपरस्कॅलर्स) मात्र अहवालाने सकारात्मक चित्र रंगवले आहे. अल्फाबेट, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा, ओरॅकल आणि स्पेसएक्स या सहा प्रमुख कंपन्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर १५ टक्के किंवा त्याहून अधिक परतावा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक एरिक शेरिडन यांनी गुंतवणूक चक्र मंदावू शकणारे तीन मुख्य धोके अधोरेखित केले आहेत ते म्हणजे अपेक्षाभंग करणारी मागणी, भांडवलाची कमतरता आणि अपुरा वीजपुरवठा. यापैकी एकही घटक कमी पडल्यास सध्याची निराशा कायमस्वरूपी घसरणीत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read About : 6G Technology Economic Impact – 2040 पर्यंत 6G तंत्रज्ञान जागतिक अर्थव्यवस्थेला देऊ शकते 1.24 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.