Ad Advertisement Ad Advertisement

Bahraich Hotel Deaths : 2 मृत्यूंचे गौडबंगाल

Bahraich Hotel Deaths : तब्बल नऊ दिवस दोघांनी तिथे एकत्र मुक्काम केला होता. मग नंतर नेमके असे काय घडले की दोघांनी फाशी लावून घेतली? खरोखरच या दोन्ही आत्महत्या आहेत की हे खुनाचे प्रकार आहेत? सहसा माणसं आत्महत्या करताना एखादी चिठ्ठी लिहून ठेवतात; पण या दोघांपैकी कोणीही अशी चिठ्ठी लिहून ठेवलेली सापडली नाही. मात्र, मृत्यूच्या घटनेपूर्वी दोघांनी एक रील बनवून इन्स्टाग्रामवर टाकल्याचे समजते.

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमातून अनोळखी माणसे जवळ येतात, नंतर व्हॉट्सॲपमार्गे त्यांचे परस्परसंवाद वाढीला लागतात. यादरम्यान जवळची माणसे मात्र दुरावू शकतात. जवळ आलेली अनोळखी माणसे अनेकदा आधी साधी मैत्री आणि नंतर प्रेमाच्या पाशात सापडतात. अशा वेळी त्यांना परस्परांचे वय, सामाजिक स्तर याचे भान राहत नसेल तेव्हा दोन्हींकडील संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. नुकतीच एक सनसनाटी घटना बहराइच इथे घडून आली.

बहराइच इथल्या घटनेची काही पाळेमुळे इन्स्टाग्राम नावाच्या समाजमाध्यमात आढळली आहेत. अद्याप या घटनेचा पूर्ण तपास झालेला नाही; पण ढोबळ रूपरेषा अशी आहे. दिनांक २ ऑक्टोबरची हकीकत आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइचच्या कोतवालीनगर ठाण्याच्या पोलिसांना दुपारी फोन आला की कोतवालीनगर परिसरातील ‘अवध कैलाश’ या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली नंबर २०१ मध्ये एक तरुण पुरुष आणि एक मध्यमवयीन महिला अशा दोघांनी फाशी लावून घेतली आहे.

पोलीस पथक तिथे रवाना झाले. त्यांनी हॉटेलचा व्यवस्थापक आणि पंचांसमक्ष व्हिडिओ कॅमेरा चालू करून चित्रीकरण करीत खोलीत प्रवेश केला, तेव्हा त्यांना रिंकू यादव (वय २६) आणि पिंकू ऊर्फ पिंकी (वय ४६) यांची फास घेतलेले मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले.

प्राथमिक तपासात निष्पन्न झाले की, हे दोघे २२ सप्टेंबरपासून त्या रूममध्ये मुक्कामाला होते. रूम घेताना त्यांनी सांगितले होते की, ते खासगी कंपनीत नोकरी करीत असून ऑफिसच्या कामानिमित्त आले आहेत. एका बातमीनुसार दोघांनी रूम घेताना आपण विवाहित असल्याचेदेखील सांगितले होते. दोघे बहुतांश वेळ रूममध्येच असायचे. त्यांना लागणाऱ्या वस्तू, चहा, नाष्टा, जेवण वगैरे रूमवर ठराविक वेळेला (रीतसर पैसे देऊन) मागवून घेत होते. पण, २ तारखेला गुरुवारी सकाळी त्यांनी चहा आणि नाष्टा खोलीत मागवला त्यानंतर ते एकदाही खोलीबाहेर पडले नाहीत. बराच काळ त्यांच्या खोलीतून काही हालचाल किंवा आवाज जाणवले नाहीत म्हणून नोकरांना शंका आली. त्यांनी दार उघडून पाहिल्यावर त्यांना हा फाशीचा प्रकार आढळला.

तब्बल नऊ दिवस दोघांनी तिथे एकत्र मुक्काम केला होता. मग नंतर नेमके असे काय घडले की दोघांनी फाशी लावून घेतली? खरोखरच या दोन्ही आत्महत्या आहेत की हे खुनाचे प्रकार आहेत? सहसा माणसं आत्महत्या करताना एखादी चिठ्ठी लिहून ठेवतात; पण या दोघांपैकी कोणीही अशी चिठ्ठी लिहून ठेवलेली सापडली नाही. मात्र, मृत्यूच्या घटनेपूर्वी दोघांनी एक रील बनवून इन्स्टाग्रामवर टाकल्याचे समजते.

दोघेजण २२ सप्टेंबर रोजी या हॉटेलात का आले होते, ते खरोखरच कुठे नोकरी करीत होते का आणि याच हॉटेलमध्ये का आले याची पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांनी खरोखरच गळफास लावून आत्महत्या केली की आधी त्यांचा अन्य मार्गाने खून करून मग लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांचे मृतदेह पंख्याला टांगले होते – हे जाणून घेण्यासाठी मृत्यूचे नक्की कारण शोधण्यासाठी पोलिसांनी फोरेन्सिक विभागाचे पथक मागवले आणि त्यांच्या करवी दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केले आहेत.

सिटी सर्कल ऑफिसर नारायण दत्त मिश्रा यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. रूम घेताना रिंकू यादवने आपले आधार कार्ड हॉटेलमध्ये दाखवले होते, त्यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकू यादव हा श्रवस्ती गावातील इकौना परिसरातून दिल्लीला आला होता. ११ जुलै २०२६ रोजी त्याचे लग्न झाले होते; पण त्यांच्यात रूढ असलेल्या पद्धतीनुसार बिदाई न झाल्यामुळे त्याची बायको अद्याप माहेरीच राहत होती. रिंकू यादव दिल्लीमध्ये मजुरी वगैरे कामे करून उदरनिर्वाह करीत होता.

तो पिंकीला घेऊन हॉटेलमध्ये आला. इतर कागदपत्रे पाहून पिंकीचीदेखील ओळख पटली. ती नोएडाच्या गौतम बुद्धनगरमधील दानकौर भागात राहायची. ती विवाहित महिला होती. कोतवालीनगर ठाण्यातील अधिकारी ब्रिजेश मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, रिंकू आणि पिंकू ऊर्फ पिंकी अनेक दिवस ‘रिलेशनशिप’मध्ये होते. पिंकीच्या घरच्यांना हे समजले होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की, रिंकू आणि पिंकी दोघांची ओळख समाजमाध्यमातून झाली होती. रिंकू मोलमजुरी करून पोट भरत होता. त्याचे हातावर पोट होते. असे असताना रिंकूपेक्षा वीस वर्षांनी मोठी असलेली आणि नोएडासारख्या भागात राहणारी पिंकी त्याच्या मोहात कशी पडली हे गूढच आहे. ती वयस्कर असूनदेखील रिंकूला पण तिची भुरळ पडली होती. तिनेदेखील त्याला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे या ओळखीचे रूपांतर अवैध संबंधात परिवर्तित झाले होते. यापूर्वीदेखील रिंकू पिंकीला नोएडामधून बहराइचला घेऊन गेला होता.

पोलिसांनी दोघांच्या घरातील सदस्यांचे जबाब नोंदवले असून त्यांच्या मोबाइलची कॉल रेकॉर्डसदेखील तपासायला घेतली आहेत. तपास पूर्ण झाल्याखेरीज या घटनेचे गौडबंगाल उलगडणार नाही.

विजय तरवडे

Read About : Assam Crime : आसामचा अमानुष असामी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.