ड्रममध्ये नोटांचे बंडल; प्रयागराजमध्ये दोन भावांची चौकशी
प्रयागराज: Prayagraj Cash Seizure उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून काळा पैसा लपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरईपूर रामनगर गावात एका घरात जमिनीत पुरून ठेवलेले तीन मोठे निळे ड्रम पोलिसांनी जप्त केले आहेत. हे ड्रम जमिनीबाहेर काढून उघडले असता, त्यात कोट्यवधी रुपयांच्या भारतीय नोटांचे बंडल कोंबून भरल्याचे उघड झाले.
पोलिसांना या घरात मोठ्या प्रमाणावर अवैध रोख रक्कम लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवाबगंज आणि सोरांव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घरात अचानक छापा टाकून खोदकाम सुरू केले. जमिनीत खोलवर गाडलेल्या ड्रममध्ये नोटा कुजू नयेत किंवा खराब होऊ नयेत म्हणून त्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये घट्ट गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या.
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेश यादव आणि राजेश यादव या दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कारवाई दरम्यान घरातील इतर सदस्य फरार झाले असून पोलिसांनी मुख्य गेटला कुलूप ठोकले आहे. जप्त केलेली रक्कम कोट्यवधींच्या घरात असून नोटा मोजण्याचे मशीन मागवून पोलिसांकडून अधिकृत मोजणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि पैशांचा मोठा आकडा लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आयकर विभाग, जीएसटी आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना पाचारण केले असून या काळ्या पैशांचा मुख्य सोर्स काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.
Read About : Ghaziabad Crime : गाझियाबादमध्ये पत्नीने जिम ट्रेनरच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट; CCTV मुळे भांडाफोड
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.