कर्टिन युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीजच्या संशोधकांना कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ जेट्सच्या वर्तनात आढळली समानता
वॉशिंग्टन : Black Hole 2 Percent Rule खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळातील सर्वात रहस्यमय घटक असलेल्या ब्लॅक होल (कृष्णविवर) बाबत एका वैश्विक नियमाचा शोध लावला आहे. एखादे कृष्णविवर आकाराने लहान असो वा सूर्यापेक्षा लाखो पटीने मोठे, ते जेव्हा अंतराळात ऊर्जा आणि प्लाझ्माचे प्रचंड लोट फेकतात, तेव्हा ते एकाच विशिष्ट भौतिक नियमाचे पालन करतात.
२ टक्क्यांचा तो वैश्विक नियम
कर्टिन युनिव्हर्सिटी आणि इन्स्टट्यिूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीजच्या संशोधकांनी टायडल डिस्ट्रप्शन इव्हेंट्स (जेव्हा एखादे कृष्णविवर ताऱ्याला गिळंकृत करते) चा सखोल अभ्यास केला. जेव्हा कृष्णविवर ताऱ्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा सर्वच भाग त्याच्या आत जात नाही, तर काही भाग उचकी दिल्यासारखा तीव्र वेगाने अंतराळात फेकला जातो, ज्याला रेडिओ जेट्स म्हणतात.
संशोधनात दिसून आले की, हे प्रचंड जेट्स प्रामुख्याने दोन टप्प्यांत बाहेर पडतात. पहिला टप्पा ताऱ्याला गिळताना सुरुवातीलाच येतो, तर दुसरा विलंबित टप्पा शेकडो किंवा हजारो दिवसांनंतर येतो. हा दुसरा टप्पा तेव्हाच सक्रिय होतो, जेव्हा कृष्णविवराचा अन्न गिळण्याचा वेग हा त्याच्या मूळ क्षमतेच्या अंदाजे २ टक्क्यांवर घसरतो. हाच २ टक्क्यांचा नियम आकाशगंगेतील छोट्या कृष्णविवरांना लागू होतो आणि तोच दूरवरच्या अतिविशाल कृष्णविवरांनाही लागू होतो, हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे.
संशोधनाचा कसा होईल फायदा
आतापर्यंत ब्लॅक होल आकाराने बदलले की त्यांचे नियम बदलतात, असा समज होता. मात्र, भौतिकशास्त्राचा हा नियम सर्वांसाठी सारखाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे भविष्यात कृष्णविवरांच्या अचानक होणाऱ्या शक्तिशाली स्फोटांचा आणि ऊर्जा उत्सर्जनाचा अचूक अंदाज लावणे वैज्ञानिकांना शक्य होणार आहे. परिणामी, जगभरातील दुर्बिणींचा वेळ आणि दिशा आधीच सेट करून या ऐतिहासिक खगोलीय घटनांचे थेट चित्रण करणे सोपे होईल.
Read About: Google Earth AI : नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलांचा आधीच मिळणार अंदाज
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.