युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचे मोठे यश!
लॉस एंजिलीस : Cancer-fighting stem cells – अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाशी (कॅन्सर) दोन हात करू शकणाऱ्या रोगप्रतिकार पेशींचा एक अखंड आणि दीर्घकाळ टिकणारा स्रोत शोधून काढला आहे. हा शोध प्रायोगिक टप्प्यावर असला, तरी भवष्यिातील कॅन्सर उपचारांसाठी (इम्युनोथेरपी) एक नवी आशा घेऊन आला आहे. प्रसिद्ध सेल या आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, ग्रॅन्युलोसाइट-मोनोसाइट प्रोजेनिटर नावाच्या अपरिपक्व बीज पेशींवर काम करून शास्त्रज्ञांनी ही कमाल केली आहे. आपल्या शरीरातील मॅक्रोफेज नावाच्या पेशी कॅन्सर आणि इतर संसर्गांशी लढणाऱ्या मुख्य पेशी मानल्या जातात.
परंतु, या परिपक्व पेशी प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात वाढवणे, फ्रीजमध्ये जतन करणे किंवा थेट शरीरात सोडणे कठीण असते; कारण शरीरात टाकल्यानंतर त्या फुफ्फुसात किंवा यकृतात जमा होऊन लवकर नष्ट होतात. यावर तोडगा म्हणून शास्त्रज्ञांनी पूर्ण तयार झालेल्या पेशींऐवजी त्यांच्या मूळ पेशींवर प्रयोग केले. या अपरिपक्व पेशींना पूर्ण विकसित होण्यापासून रोखून, प्रयोगशाळेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात यश आले.
पेशींना दिले प्रशिक्षण
अनुवांशिक बदल करून कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर तंत्रज्ञानाद्वारे या पेशींना कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांच्यावर थेट हल्ला करण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. या पेशींमध्ये असाही बदल केला गेला, ज्यामुळे त्या शरीरातील इतर रोगप्रतिकार पेशींना कॅन्सरविरोधात लढण्यासाठी उठवून उभे करतात. उंदरांमध्ये या बदललेल्या पेशी सोडल्यानंतर, त्यांनी थेट अस्थिमज्जेत स्वतःचे स्थान बनवले आणि तेथून सतत नवीन कॅन्सरविरोधी पेशी तयार करणे सुरू ठेवले. रक्ताचा कर्करोग आणि गाठी असणारा कर्करोग या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये रोगाचा प्रसार लक्षणीयरीत्या मंदावला.
महत्त्वाचा शोध
सध्याच्या इम्युनोथेरपीमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वारंवार काढून त्यावर प्रक्रिया करावी लागते. पण मूळ पेशींच्या या तंत्रज्ञानामुळे एकाच दात्याच्या पेशींपासून मोठ्या प्रमाणावर आणि तयार औषध बनवणे शक्य होईल. या पेशी अस्थिमज्जेत राहून सतत नवीन पेशी तयार करत असल्याने, उपचाराचा प्रभाव शरीरात दीर्घकाळ टिकून राहील. हा शोध केवळ कर्करोगापुरता मर्यादित नसून, क्रॉनिक ग्रॅन्युलोमॅटस रोग नावाच्या जन्मजात रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या आजारातही प्रभावी ठरला आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात या पेशींनी जिवाणूंविरुद्ध लढण्याची क्षमता पुन्हा मिळवून दिली.
Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.