एपीके फाईल्स डॉऊनलोड होताच मोबाइल हॅक, सायबर पोलिसांच्या तत्परतेने दोन महिन्यांत रक्कम मिळाली परत
Cyber Fraud 1 Crore छत्रपती संभाजीनगर : व्हाट्सॲपवर आलेली आरटीओ चालानची एपीके फाईल आपोआप डाऊनलोड झाल्याने मोबाइल हॅक झाला आणि सायबर भामट्यांनी एका नामांकित उद्योजकाला १ कोटी रुपयांचा गंडा घातला होता. फसवणुकीचा प्रकार समोर येताच गोल्डन अवरमध्ये सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याने ही सर्व रक्कम ज्या खात्यात वळती केली ते खाते फ्रिज करण्यात सायबर पोलिसांना यश आले होते. त्यामुळे अवघ्या २ महिन्यांत ही रक्कम उद्योजकाला परत मिळाली. त्याबद्दल १ ऑक्टोबर रोजी उद्योजक तरुण सोहिंदा यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन पोलिसांचे आभार मानले.
उद्योजक तरुण सोहिंदा यांची एनवे बायोटेक प्रा. लि. नावाने हेल्थ सप्लिमेंट ड्रिंक कंपनी आहे. ४ ऑगस्टला सोहिंदा यांच्या मोबाइलवर अज्ञात क्रमांकावरून आरटीओ चालान नावाने एपीके फाइल आली. ती फाइल आपोआप डाऊनलोड झाल्याने मोबाइल हॅक झाला आणि त्याचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे गेला. सायबर भामट्यांनी लगेचच कंपनीच्या अकाउंटंटला बँक खाते क्रमांक देऊन १ कोटी रुपये पाठविण्यास सांगितले. मालकाचाच मेसेज समजून अकाउंटंटने ही रक्कम पाठविली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी पुन्हा ४ कोटी रुपये पाठविण्यास सांगितले. तेव्हा अकाउंटंटला शंका आली. त्यांनी लगेचच सोहिंदा यांना फोन केला. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले होते.
लखनौ ते दिल्लीपर्यंतच्या खात्यात गेली होती रक्कम
तक्रार येताच तत्कालिन सायबर पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, गुन्हे शाखा निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक गणेश गिरी, अंमलदार सुशांत शेळके, योगेश तळवंदे, सचिन संपाळ, सोनाली वडनेरे, वैभव वाघचौरे, गोकूळ कुतरवाडे, राम काकडे, संदीप पाटील, माला सलामपुरे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास केला. ही रक्कम लखनौ ते दिल्लीपर्यंतच्या वेगवेगळ्या सात खात्यांत गेल्याचे स्पष्ट होताच ही सर्व खाती गोठवली. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना ही रक्कम काढता आली नाही. न्यायालयाच्या आदेशाने ती उद्योजक सोहिंदा यांना परत करण्यात आली.
अनोळखी क्रमांकावरून लिंक्स किंवा एपीके फाइल येतात. त्या डाऊनलोड करू नयेत. चुकून डाऊनलोड झाल्यास तत्काळ खबरदारी घेतली पाहिजे. उद्योजकांनी त्यांच्या अकाउंटंटला फोन केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत, असे आदेश देऊन ठेवावेत. सायबर फसवणूक टाळण्यासाठी पिन नंबर, पासवर्ड, ओटीपी कोणालाही सांगू नये. तसेच, तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
– प्रवीण पवार, पोलीस आयुक्त
Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.