Ad Advertisement Ad Advertisement

SIM Card Fraud – दुसऱ्याच्या नावावर सिम वापरल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांपर्यंत दंड

केंद्र सरकारच्या नवीन दूरसंचार कायद्यानुसार बनावट कागदपत्रे वापरून किंवा दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड मिळवणे व वापरणे हा अजामीनपात्र गुन्हा

नवी दिल्ली – SIM Card Fraud केंद्र सरकारच्या नवीन दूरसंचार कायद्यानुसार फसवणूक करून किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड मिळवणे आणि वापरणे आता एक गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा अत्यंत कडक निर्णय घेतला आहे. त्याविषयी माहिती जाणून घेऊया.

कायद्यातील तरतुदी आणि कडक शिक्षा

या कायद्याच्या कलम ४२(३)(इ) नुसार, जर एखादी व्यक्ती बनावट कागदपत्रे वापरून, खोटी ओळख दाखवून किंवा फसवेगिरीने सिम कार्ड किंवा इतर दूरसंचार सेवा मिळवताना आढळली, तर तिच्यावर कडक कारवाई केली जाईल. या गुन्ह्यासाठी दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा, ५० लाख रुपयांपर्यंतचा प्रचंड आर्थिक दंड, किंवा हे दोन्ही एकाच वेळी होऊ शकतात.

मदत करणाऱ्यांनाही होणार समान शिक्षा

नवीन कायद्यानुसार, केवळ गैरवापर करणाऱ्यालाच नाही, तर या गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्यालाही तितकीच कडक शिक्षा दिली जाईल. कायद्याच्या कलम ४२(६) नुसार, दुसऱ्याच्या नावावर सिम मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे पुरवणे, स्वतःचे ओळखपत्र जाणीवपूर्वक गैरप्रकारासाठी देणे किंवा कोणत्याही प्रकारे या फसवणुकीला मदत करणे हासुद्धा मूळ गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाईल आणि त्यालाही सारखीच शिक्षा होईल. त्यामुळे नागरिकांनी आपली केवायसी कागदपत्रे किंवा जुनी सिम कार्ड्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हाती पडणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

‘संचार साथी’ आणि ‘चक्षु’ पोर्टलद्वारे सुरक्षा

तुमच्या नकळत तुमच्या आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रावर कोणी सिम कार्ड तर वापरत नाही ना, हे तपासण्यासाठी दूरसंचार विभागाने ‘संचार साथी’ हे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन नागरिक त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स सुरू आहेत, याची संपूर्ण यादी पाहू शकतात. जर त्या यादीत एखादा अनोळखी किंवा संशयास्पद नंबर आढळला, तर त्याची त्वरित तक्रार करून तो नंबर बंद करण्याची विनंती देखील तेथून करता येते. याशिवाय, फसवणुकीचे किंवा संशयास्पद कॉल्स आणि मेसेजची थेट तक्रार करण्यासाठी या पोर्टलवर ‘चक्षु’ ही विशेष यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read About : New Snail Species 2026 – माँटेनिग्रोमध्ये गोगलगाईच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; कवचाला खास ‘दरवाजा’
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.