डेंटल इम्प्लांटमधून बाहेर पडणारे टायटॅनियमचे सूक्ष्म कण रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यात अडथळा आणू शकतात
न्यू जर्सी : Dental Implant Titanium Particles – गमावलेले दात पुन्हा मिळवण्यासाठी ‘डेंटल इम्प्लांट’ हा प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, या इम्प्लांटभोवती गंभीर संसर्ग होऊन जबड्याच्या हाडांचे नुकसान होऊ शकते. ‘पीएनएएस नेक्सस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, इम्प्लांटमधून बाहेर पडणारे टायटॅनियमचे सूक्ष्म कण शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच हायजॅक करू शकतात.
अमेरिकेतील रुटगर्स विद्यापीठाच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधकांनी या समस्येमागील महत्त्वाची यंत्रणा आपल्या अभ्यासात उलगडली आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार, डेंटल इम्प्लांट बसवलेल्या सुमारे १० ते २० टक्के रुग्णांमध्ये ‘पेरिइम्प्लांटायटिस’ हा संसर्ग विकसित होतो. या स्थितीत इम्प्लांटभोवतीच्या हिरड्या आणि जबड्याच्या हाडांना नुकसान पोहोचते. नैसर्गिक दातांभोवती होणाऱ्या हिरड्यांच्या संसर्गावर प्रतिजैविके आणि व्यावसायिक स्वच्छतेचा चांगला परिणाम होऊ शकतो; मात्र, इम्प्लांटच्या संसर्गात उपचार अनेकदा अपेक्षित परिणाम देत नाहीत.
टायटॅनियमचे कण कसा घडवतात परिणाम?
इम्प्लांटच्या पृष्ठभागावर जमा होणाऱ्या जिवाणूंमुळे आम्लयुक्त थर तयार होतो. त्यामुळे टायटॅनियमच्या पृष्ठभागाची झीज होऊन अतिसूक्ष्म धातुकण आसपासच्या ऊतींमध्ये पसरतात. हे कण जिवाणूंच्या विषारी घटकांना आकर्षित करतात. त्यानंतर जिवाणूंना नष्ट करणाऱ्या ‘मॅक्रोफेज’ या रोगप्रतिकारक पेशी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतात; परंतु टायटॅनियमचे कण पचवता न आल्याने या पेशींमध्ये दीर्घकाळ दाह निर्माण होतो.
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये अशा कणांच्या संपर्कात आलेल्या मॅक्रोफेज पेशींची जिवाणूंना गिळण्याची क्षमता निम्म्याहून अधिक घटल्याचे आढळले. परिणामी, संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि हाडांची झीज वाढू शकते.
उपचारांसाठी नवी दिशा
मानवी ऊतींचे नमुने, प्रयोगशाळेतील मानवी रोगप्रतिकारक पेशी आणि जनुकीय बदल केलेल्या उंदरांवर संशोधन करण्यात आले. संशोधकांनी ‘टीआरपीसी १’ या कॅल्शियम चॅनेलची भूमिका शोधून काढली. उंदरांमध्ये हे चॅनेल निष्क्रिय केल्यावर दाह कमी झाला आणि जिवाणूंशी लढण्याची क्षमता सुधारली. या निष्कर्षांमुळे भविष्यात नवीन औषधे विकसित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मानवांसाठी उपचार उपलब्ध होण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.
इम्प्लांटची स्वच्छता महत्त्वाची
डेंटल इम्प्लांट असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे दंतवैद्याकडून तपासणी आणि योग्य स्वच्छता करून घेणे महत्त्वाचे आहे. इम्प्लांटचा पृष्ठभाग ओरखडला जाणार नाही, अशा सौम्य पद्धती वापरणे आवश्यक आहे. नैसर्गिक दातांसाठी वापरली जाणारी काही धातूची उपकरणे इम्प्लांटच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे योग्य स्वच्छता आणि वेळेवर उपचार हे संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
Read About: Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.