Ad Advertisement Ad Advertisement

Microsoft Voluntary Retirement Scheme : समस्येला सामोरे जाताना…

Microsoft Voluntary Retirement Scheme : मायक्रोसॉफ्ट या जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली स्वेच्छानिवृत्तीची योजना ही केवळ एका कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापनापुरती मर्यादित घटना नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने वाढणारा वापर, मानवी बुद्धिमत्तेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची वाढती गरज, उद्योगविश्वाची बदलती व्यावसायिक धोरणे आणि त्यामुळे रोजगाराच्या सुरक्षिततेविषयी निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता या व्यापक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहणे आवश्यक आहे.

कारण ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न मायक्रोसॉफ्टसोबत जोडला गेला आहे, त्यांना यापुढची नीती काय असेल हा प्रश्न आता सतावत असेलच, पण या कंपनीची ही स्वेच्छानिवृत्ती नीती पाहता, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलत असेल तर भविष्यातील अर्थव्यवस्थेत सामान्य कर्मचाऱ्यांचे नेमके स्थान काय असेल, याची चर्चादेखील या निमित्ताने करावी लागणार आहे.

विविध माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर करताना अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि भारतातील काही विभागांत काम करणाऱ्या सुमारे ६० हजार पात्र कर्मचाऱ्यांना काही आर्थिक लाभ व भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या काही योजना देऊ केल्या असून त्या स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांस नोकरी सोडण्याचा पर्याय दिला आहे. अर्थात, या योजनेच्या लाभाकरिता पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जाणार असा याचा अर्थ दिसत नाही. ही स्वेच्छानिवृत्ती योजना असल्याने, किती कर्मचारी यात स्वत:हून या योजनेनुसार लाभ घेऊन कंपनी सोडतील हे स्पष्ट झालेले नाही.

या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक केली असून याद्वारे सॉफ्टवेअर तयार करणे, माहितीचे विश्लेषण, ग्राहकसेवा, चाचण्या, दस्तऐवजीकरण आणि प्रशासकीय कामे अधिक वेगाने करता येऊ शकतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी करूनही कंपनीला आपली कार्यक्षमता वाढविता येणार असल्याने, मानवी हातांना मिळणाऱ्या कामाच्या संधी कमी होऊन रोजगारांचे प्रश्न अधिक गंभीर होण्याच्या भीतीला या निर्णयाचे बळ मिळाले आहे. सहाजिकच कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र मानवी रोजगाराच्या संधी हिरावून घेणार की रोजगाराचे नवे जग निर्माण करणार, हा प्रश्नदेखील यामुळे अधोरेखित झाला आहे.

याचे उत्तर शोधताना तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाच्या इतिहासाकडे पाहावे लागेल. यंत्रमागामुळे हातमागावरील रोजगार बदलले. संगणकामुळे टंकलेखन, लेखा आणि कार्यालयीन कामांचे स्वरूप बदलले. इंटरनेटमुळे अनेक पारंपरिक व्यवसायांना धक्का बसला आणि त्याच वेळी ई-कॉमर्स, डिजिटल जाहिरात, सॉफ्टवेअर आणि नव्या सेवा उद्योगांचा विस्तार झाला, त्यामुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलले, नव्या संधींनी निर्माण केलेली आव्हाने पेलण्याची क्षमता मिळविण्याची गरज वाढू लागली आणि ज्यांनी ही क्षमता साध्य केली, त्यांना या बदलाच्या प्रवाहात सहज पुढे जातादेखील आले.

अर्थात, यापूर्वी तंत्रज्ञानातील प्रगतीने माणसाच्या शारीरिक श्रमांची जागा घेतली किंवा त्यांना अधिक कार्यक्षम बनवले. कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र भाषेचा वापर, माहितीचे विश्लेषण, निर्णयांना साहाय्य, लेखन आणि काही सर्जनशील कामेही करू शकते, त्यामुळे त्याचा परिणाम रोजगारावर होणे अपरिहार्य आहे. काही नोकऱ्या कमी होतील, काही नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आणि रोजगाराच्या काही नव्या संधीदेखील निर्माण होतील. तरीही ज्या वेगाने सध्याच्या रोजगाराच्या संधी नष्ट होतील, त्या वेगाने नव्या नोकऱ्या निर्माण होतील का हा प्रश्न मात्र यापुढे अधिक उग्र होण्याची शक्यता असल्याने; तंत्रज्ञानाची क्षमता, खर्च, नियम, ग्राहकांचा विश्वास आणि कंपन्यांचे निर्णय या बाबींवर रोजगाराच्या संधींचे परिणाम अवलंबून राहणार हे स्पष्ट होणार आहे.

सुदैवाने भारताच्या संदर्भात हे जागतिक परिणाम जसेच्या तसे लागू होतीलच असेही नाही. कारण सेवा क्षेत्रातील ताकद, मोठी तरुण लोकसंख्या, आयटी उद्योग, अभियांत्रिकी शिक्षण आणि जागतिक कंपन्यांसाठी काम करण्याची क्षमता ही भारताची बलस्थाने आहेत. त्यासाठी नव्या आव्हानांना अंगावर घेण्याची क्षमता असलेले प्रशिक्षण आणि उद्योगांच्या गरजांशी सुसंगत असणारी कौशल्ये आत्मसात करावी लागतील, त्यामुळे भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे केवळ नोकऱ्या कमी होतील या भीतीपेक्षाही, नव्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्याचे आव्हान आपण कसे पेलणार हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी शिक्षणव्यवस्थेत सुसंगत बदल करणे ही पहिली गरज असेल.

घोकंपट्टीची पठडीबाज अभ्यास परंपरा आता कालबाह्य ठरेल आणि पाठांतरापेक्षा आकलनक्षमता वाढविणाऱ्या अभ्यासाची नवी परंपरा निर्माण करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील साक्षरता वाढवावी लागेल. ग्रामीण आणि शहरी भागांतील डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रातील दरी बुजविण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. केवळ नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे पुरेसे नाही.

त्याचे स्वागत तर करावेच लागेल, पण त्याच्या प्रवेशामुळे विस्थापित होणाऱ्यांनाही अर्थव्यवस्थेत पुन्हा स्थान मिळवून द्यावे लागेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता हा केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रश्न नाही. अर्थव्यवस्थेची रचना, संधी आणि संपत्तीचे समान वाटप आणि सामाजिक न्याय हे मुद्देही त्याच्याशी जोडले जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यातील रोजगाराचे चित्र पूर्णपणे अंधकारमय असे म्हणणे योग्य नाहीच, पण यामुळे सर्वांना समृद्धीची दारे खुली होतील ही आशादेखील वास्तववादी नाही. उद्योगक्षेत्रातील घडामोडी न्याहाळताना, भविष्याच्या आव्हानांचे हे चित्र दुर्लक्षित करता येणार नाही.

Read About : India defence procurement : सज्जतेचे सामर्थ्य!

E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.