१,६५० सहभागींच्या अभ्यासातून महत्त्वाचे निरीक्षण; स्वतःला कोणतीही इजा होणार नाही, अशी प्रबळ भावना भयावह अनुभवांचा आनंद घेण्यामागे ठरू शकते महत्त्वाची.
टोरँटो : Fear and Thrill Psychology भयपट पाहताना किंवा धोकादायक प्रसंग अनुभवताना अनेकांना भीती, अस्वस्थता आणि घबराट जाणवते. मात्र, काही व्यक्तींना अशाच प्रसंगांत भीतीऐवजी रोमांच आणि आनंद मिळतो. यामागे स्वत:ला कोणतीही इजा होणार नाही, अशी प्रबळ भावना कारणीभूत असू शकते, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून समोर आला आहे. हे संशोधन ‘सायकोलॉजिकल रिपोर्टस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
कॅनडातील ब्रॉक विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापक अँजेला बुक यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी हा अभ्यास केला. यात १,६५० सहभागींचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात ८२५ जणांच्या व्यक्तिमत्त्वातील सायकोपॅथिक गुणधर्म आणि स्वत:ला धोक्यापासून वाचवू शकण्याविषयीची भावना तपासण्यात आली. Fear and Thrill Psychology
त्यानंतर सहभागींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दोन व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यापैकी एक रोलर कोस्टरच्या रोमांचक अनुभवाचा, तर दुसरा ‘आउटलास्ट’ या हॉरर व्हिडिओ गेममधील भयावह दृश्यांचा होता. भीती, घबराट, उत्साह आणि आनंद या भावनांचे मूल्यांकन करण्यात आले.
अजिंक्य असल्याची भावना महत्त्वाची
अभ्यासात सायकोपॅथिक गुणधर्म अधिक असलेल्या व्यक्तींना भयावह दृश्यांमुळे तुलनेने कमी अस्वस्थता आणि अधिक उत्साह जाणवत असल्याचे दिसले. स्वत:ला इजा होण्याची शक्यता कमी वाटणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मक भावना आणखी कमी होत्या. दुसऱ्या टप्प्यात कंटाळ्याचा या प्रतिक्रियांशी संबंध आहे का, हे तपासण्यात आले. अशा व्यक्तींना लवकर कंटाळा येत असला, तरी भयावह प्रसंगांचा आनंद घेण्यामागे ते प्रमुख कारण नसल्याचे संशोधकांना आढळले. Fear and Thrill Psychology
भीतीचा अनुभव वेगळ्या प्रकारे घेतात
सायकोपॅथिक गुणधर्म म्हणजे सहानुभूतीचा अभाव, आवेगशीलता, हाताळणीची प्रवृत्ती आणि जोखीम घेण्याची तयारी अशा व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचा समूह. मात्र, अशा व्यक्तींना भीती अजिबात वाटत नाही, असा या संशोधनाचा अर्थ नाही. त्या भीतीचा अनुभव आणि अर्थ इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे घेत असू शकतात. अभ्यासात व्हिडिओ आणि स्व-अहवालांचा वापर झाला असून, प्रत्यक्ष धोकादायक परिस्थितीतील प्रतिक्रिया तपासण्यासाठी आभासी वास्तव तंत्रज्ञानाद्वारे पुढील संशोधन आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. Fear and Thrill Psychology
Read About : OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.