शेतकऱ्यांना मिळते डिजिटल बाजारपेठेची सुविधा
नवी दिल्ली : e-NAM Portal Registration देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना (मंडईंना) जोडण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-नाम (e-NAM) पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी आपला शेतमाल ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील व्यापारी आणि खरेदीदारांपर्यंत पोहोचता येते. तसेच शेतमालाच्या गुणवत्तेनुसार योग्य भाव मिळण्यास मदत होते आणि विक्रीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात.
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि सुविधा राबवत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ई-नाम (e-NAM) पोर्टल. हे भारत सरकारचे देशव्यापी इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यासपीठ असून त्याचे पूर्ण नाव राष्ट्रीय कृषी बाजार (e-National Agriculture Market) असे आहे. या माध्यमातून शेतकरी देशभरातील विविध बाजार समित्यांमधील व्यापारी आणि खरेदीदारांशी जोडले जाऊ शकतात. तुम्हीही शेतकरी असाल, तर ई-नाम पोर्टलवर नोंदणी कशी करायची, याची माहिती असणे आवश्यक आहे. या सुविधेमुळे शेतमालाला गुणवत्तेनुसार चांगला दर मिळवण्याची संधी उपलब्ध होते.
ई-नाम पोर्टल म्हणजे काय?
- ई-नाम पोर्टलवर शेतमालाची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. त्यानंतर शेतमालाची गुणवत्ता तपासण्यासाठी तो संबंधित बाजार समितीमध्ये न्यावा लागतो.
- शेतमालाची गुणवत्ता तपासल्यानंतर त्याचा लॉट तयार केला जातो आणि त्याची माहिती ई-नाम पोर्टलवर अपलोड केली जाते. या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून देशभरातील छोटे-मोठे व्यापारी तसेच इतर खरेदीदार शेतमालासाठी ऑनलाइन बोली लावू शकतात.
- ज्या खरेदीदाराकडून सर्वाधिक दर मिळतो, त्याला शेतकरी आपला शेतमाल विकू शकतात. विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतमालाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
ई-नाम पोर्टलवर नोंदणी कशी करावी?
- ई-नाम पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येते. त्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई-नामच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
- पोर्टलवर उपलब्ध असलेल्या Registration या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर नोंदणीसाठी दोन पर्याय दिसतील.
- यामध्ये Individual User हा पर्याय निवडावा.
- User Type मध्ये Seller हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची (मंडीची) निवड करावी.
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक आणि इतर आवश्यक माहिती भरावी.
- सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP च्या माध्यमातून पोर्टलवर लॉगिन करू शकतात.
नोंदणी करताना ही घ्या काळजी
ई-नाम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही एजंटला पैसे देण्याची आवश्यकता नाही. नोंदणीच्या नावाखाली सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा इतर ऑनलाइन माध्यमातून येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
फसवणूक टाळण्यासाठी केवळ अधिकृत पोर्टल आणि सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवा. तसेच नोंदणी करताना आपली वैयक्तिक माहिती आणि OTP कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
Read About : Lek Ladki Yojana online application- ‘लेक लाडकी’ योजनेचा अर्ज आता घरबसल्या करा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.