हरित ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या संशोधनाला नवी दिशा
बंगळुरू : IISc Bengaluru AI Research भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने हवेतील घातक कार्बन डायऑक्साइडचे थेट उपयुक्त इंधनात रूपांतर करणाऱ्या तब्बल ९,३८९ नवीन रासायनिक प्रक्रिया शोधून काढल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रक्रिया आजवरच्या पारंपारिक विज्ञानाला आणि मॉडेल्सना शोधता आल्या नव्हत्या.
पारंपारिक मॉडेल्सच्या मर्यादा स्पष्ट
या ऐतिहासिक शोधापूर्वी, शास्त्रज्ञांकडे सीओ २ चे इंधनात (उदा. मिथेनॉल) रूपांतर करण्यासाठी केवळ १५२ रासायनिक मार्ग उपलब्ध होते. जुनी कॉम्प्युटेशनल मॉडेल्स या प्रक्रियांच्या गुंतागुंतीच्या पायऱ्या अचूकपणे सांगण्यास असमर्थ ठरत होत्या मात्र, आयआयएससी च्या संशोधकांनी विकसित केलेल्या नवीन एआय फ्रेमवर्कमुळे या प्रक्रियेतील अचूकता आणि क्षमता थेट ४० पटीने वाढली आहे
तांब्याचा उत्प्रेरक ठरणार गेमचेंजर
या संशोधनात शास्त्रज्ञांनी तांब्याच्या पृष्ठभागावर सीओ २ आणि हायड्रोजन यांच्यात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा सखोल अभ्यास केला. एआयच्या मदतीने शोधून काढलेल्या या नव्या मार्गांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्यापासून मिथेनॉल आणि इतर मौल्यवान रसायने अत्यंत वेगाने आणि कार्यक्षमतेने तयार करता येणे शक्य होणार आहे.
शोधाचे असे होतील फायदे
हरित ऊर्जा निर्मिती : भविष्यात खनिज तेलांवरील (पेट्रोल-डिझेल) जगाचे अवलंबित्व कमी होऊन शाश्वत इंधनाचा नवा पर्याय उपलब्ध होईल.
प्रदूषणावर नियंत्रण : कारखाने आणि वातावरणातील कार्बन थेट इंधनात बदलल्यामुळे वायू प्रदूषण आणि तापमानवाढ रोखण्यास मोठी मदत होईल.
वेळेची अभूतपूर्व बचत : प्रयोगशाळेत ज्या प्रक्रिया शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेक वर्षे लागली असती, तो प्रचंड डेटा एआय ने अवघ्या काही दिवसांत अचूक विश्लेषणासह समोर आणला आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.