Ad Advertisement Ad Advertisement

India office space occupancy 2026- देशातील कार्यालयीन जागेत ७ टक्क्यांची वाढ

पुण्याने ओलांडला १० कोटी चौरस फुटांचा टप्पा; देशातील आठ प्रमुख शहरांतील कार्यालयीन जागा ९१७.७ दशलक्ष चौरस फुटांवर

India office space occupancy 2026 : मुंबई : देशातील प्रमुख आठ शहरांमधील व्यावसायिक कार्यालयीन जागेच्या वापरात सप्टेंबर २०२६ अखेर वार्षिक तुलनेत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शहरांमधील वापरात असलेली कार्यालयीन जागा ९१७.७ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे प्रमाण ८५९.४ दशलक्ष चौरस फूट होते. पुणे शहराने वापरातील कार्यालयीन जागेच्या बाबतीत १०० दशलक्ष चौरस फुटांचा टप्पा ओलांडला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी नाईट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
देशातील व्यावसायिक कार्यालयीन जागेची मागणी कायम असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, विविध शहरांतील वाढीचा वेग वेगवेगळा आहे. हैदराबादमध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) सर्वांत कमी वाढ झाली आहे.

हायटेक शहर बंगळुरूची आघाडी कायम

बंगळुरू हे देशातील सर्वात मोठे कार्यालयीन बाजारपेठ असलेले शहर ठरले आहे. येथील वापरातील कार्यालयीन जागा एका वर्षात ९ टक्क्यांनी वाढून २२७.९ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली. सप्टेंबर २०२५ मध्ये हे प्रमाण २०८.३ दशलक्ष चौरस फूट होते. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) १७८.३ दशलक्ष चौरस फुटांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, येथे कार्यालयीन जागेच्या वापरात केवळ २ टक्के वाढ झाली. मुंबईत हे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढून १४८.२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचले.

हैदराबादमध्ये सर्वाधिक ११ टक्के वाढ

आठ प्रमुख शहरांमध्ये हैदराबादने सर्वाधिक ११ टक्के वाढ नोंदविली. येथील वापरातील कार्यालयीन जागा ११९.८ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली. व्यावसायिक विस्तार आणि बदलत्या कार्यपद्धतींमुळे कार्यालयीन जागेची मागणी वाढत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

पुण्याची शंभर दशलक्ष चौरस फुटांकडे झेप

पुण्याने वापरातील कार्यालयीन जागेच्या बाबतीत १०० दशलक्ष चौरस फुटांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. सप्टेंबर २०२६ अखेर पुण्यात १०१ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा वापरात होती. वर्षभरापूर्वी हे प्रमाण ९२.४ दशलक्ष चौरस फूट होते. त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुण्याने हा टप्पा गाठणे ही शहराच्या व्यावसायिक स्थळ म्हणून वाढत्या महत्त्वाची पावती असल्याचे नाईट फ्रँक इंडियाचे आंतरराष्ट्रीय भागीदार आणि वरिष्ठ कार्यकारी संचालक विरल देसाई यांनी सांगितले.

अहमदाबाद, कोलकाताही पुढे

अहमदाबादमध्ये वापरातील कार्यालयीन जागेत १० टक्क्यांची वाढ होऊन ती २८ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली. कोलकात्यात ९ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, तेथील कार्यालयीन जागेचे प्रमाण २५ दशलक्ष चौरस फूट झाले. चेन्नईमध्येही ५ टक्क्यांची वाढ होऊन कार्यालयीन जागा ८९.५ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली.

वाढीचा वेग सर्वत्र समान नाही

नाईट फ्रँक इंडियाचे विरल देसाई यांच्या मते, देशातील कार्यालयीन बाजारपेठ व्यावसायिक विस्तार आणि कंपन्यांच्या बदलत्या गरजांमुळे सातत्याने विकसित होत आहे. पारंपरिक व्यावसायिक केंद्रांबरोबरच अन्य शहरांमध्येही कार्यालयीन जागेचा विस्तार होत असला तरी वाढीचा वेग सर्वत्र समान नाही.

Read About: UPI Charges Update – दिवाळीनंतर UPI शुल्क लागू होणार; 2,000 रुपयांवरील निवडक व्यापारी व्यवहारांवर परिणाम

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.