राज्यातील ३२ नागरिकांसाठी म्यानमार सरकार आणि भारतीय दूतावासाचा सातत्याने संपर्क, पत्रव्यवहार
Myanmar rescue operation for 32 Maharashtra citizens बीड : परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या जाळ्यात अडकलेल्या बीड जिल्ह्यातील नांदुरघाट (ता. केज) येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्रातील ३२ नागरिकांना म्यानमारमधील सायबर अड्ड्यांवरून सुरक्षित सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवर हालचाली तीव्र झाल्या आहेत.
या सर्वांच्या सुटकेसाठी म्यानमार सरकार आणि भारतीय दूतावास यांच्यात सातत्याने संपर्क व संवाद सुरू आहे. यासंबंधी रेस्क्यू ऑपरेशन राबवून याठिकाणाहून ओलितांची सुटका करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे म्यानमार सरकारने तेथील भारतीय दुतावासाला कळविले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती सर्व संबंधितांना देखील दिली आहे.
हा सारा प्रकार २६ जून २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके या तरुणाच्या बाबतीत घडल्यानंतर समोर आला होता, तेव्हापासून बीड पोलिसांकडून सातत्याने वरिष्ठांशी पत्रव्यवहार सुरु आहे. स्वप्नील यांची पत्नी संगीता काळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बीड सायबर ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झालेला असून हे प्रकरण सध्या तपासावर आहे. स्वप्नील यांना सोशल मीडियावर बँकॉक (थायलंड) येथे ग्राफिक डिझायनिंगच्या नोकरीची जाहिरात दिसली होती. महिना ७० हजार रुपयांच्या पगाराचे आमिष दाखवून ४ जून २०२६ रोजी त्यांना पुण्यावरून विमानाने बँकॉकला बोलावून घेण्यात आले.
मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना बँकॉकवरून थेट म्यानमार-थायलंड सीमेवरील दुर्गम आणि संशयित भागात नेण्यात आले. तिथे नेल्यानंतर स्वप्नील यांचा पासपोर्ट आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे काढून घेण्यात आली. त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून दररोज १६ ते १८ तास जबरदस्तीने ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे. काम न केल्यास किंवा विरोध केल्यास मारहाण करणे, विजेचे शॉक देणे आणि जिवाने मारण्याची धमकी दिली जात असल्याची धक्कादायक माहिती स्वप्नील यांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे आपल्या पत्नीला दिली. या ठिकाणी महाराष्ट्रातील २५ तरुणांचा समावेश असल्याचेही स्वप्नील यांनी असांगितले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाचा पत्रव्यवहार (Myanmar rescue operation for 32 Maharashtra citizens)
बीड सायबर पोलीस आणि महाराष्ट्र गृह विभागाच्या माध्यमातून या गंभीर प्रकरणाची माहिती केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली. त्यानंतर म्यानमारमधील भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करत तेथील केंद्र, राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा ठामपणे मांडला आहे. बीडच्या तरुणासह महाराष्ट्रातील ३२ नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाने म्यानमार प्रशासनाला एक स्वतंत्र राजनैतिक पत्र पाठवले असून त्यांच्या जलद व सुरक्षित वापसीची मागणी केली आहे.
सुटका प्रक्रियेत मोठा अडथळा
सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या म्यावाडी भागात हे सायबर स्कॅम सेंटर्स चालवली जात आहेत, तो परिसर गैर-सरकारी सशस्त्र गट किंवा बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे. तिथे म्यानमार सरकारचे थेट नियंत्रण नसल्यामुळे सुरक्षा दलांच्या रेस्क्यू ऑपरेशनला तांत्रिक अडचणी येत असून सुटका प्रक्रियेला विलंब होत आहे. मात्र, म्यानमार सरकार यावर मार्ग काढून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.
आत्तापर्यंत २,५२५ भारतीयांची सुटका
आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पासून आतापर्यंत म्यानमारमधील अशा फसव्या अड्ड्यांवरून २,७१५ भारतीयांची नोंद झाली आहे. त्यापैकी दूतावासाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल २,५२५ नागरिकांना सुरक्षितपणे सोडवून भारतात परत आणण्यात यश आले आहे. उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती भारतीय दुतावासाने कळविली आहे.
नागरिकांनी सतर्क असावे
परदेशात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांनी म्यानमारमधील भारतीय दूतावासाशी थेट संपर्क साधून खात्री केल्याशिवाय किंवा अधिकृत मध्यस्थांशिवाय कोणतीही नोकरी स्वीकारू नये, असे आवाहन जारी करण्यात आले आहे. तसेच सर्व पोलीस व प्रशासनाला अशा बनावट जॉब सिंडिकेट्सबद्दल जनतेत मोठी जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील तरुणाच्या अपहत प्रकरणात बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तरुणाच्या सुटकेसाठी वेळोवेळी आम्ही गृह विभाग आणि परराष्ट मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात राहून राजनैतिक पातळीवर पत्रव्यवहार करत आहोत. सर्व अपहतांची सुरक्षित सुटका होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन वेगाने प्रयत्न सुरु आहेत.
– नवनीत कॉँवत, जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड
Read About : Marine Drive Police Attack 2026 – ऑन-ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.