Ad Advertisement Ad Advertisement

Iran Military Threat – हल्ला झाला तर प्रत्युत्तर कुठेही, कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही

इराणप्रमुखांचा आक्रमक पवित्रा : लक्ष्यांची यादी नव्याने करण्याचे लष्कराला निर्देश

तेहरान : Iran Military Threat – हल्ला झाला तर कोणतीही भौगोलिक मर्यादा न पाळता चोख प्रत्युत्तर द्या, असा आदेश इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई यांनी शनिवारी लष्करी अधिकाऱ्यांना दिला आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांच्या अधिकृत टेलिग्राम खात्यावर हे निवेदन प्रसिद्ध झाले. कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही पातळीवरील धोक्याला तातडीने, प्रभावीपणे आणि कोणतीही भौगोलिक मर्यादा न पाळता प्रत्युत्तर दिले जावे, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

हा आदेश दोन कारणांनी महत्त्वाचा मानला जातो. पहिले कारण म्हणजे प्रत्युत्तराला भौगोलिक सीमा नसतील, हे इराणने यापूर्वी इतक्या थेट शब्दांत कधीही सांगितले नव्हते. याचा अर्थ, हल्ला झाल्यास इराणचे प्रत्युत्तर फक्त आपल्या सीमेपुरते किंवा शेजारी प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाही. दुसरे कारण म्हणजे खामेनेई यांनी लष्कराला लक्ष्यांची माहिती-यादी (टार्गेट डेटाबेस) नव्याने अद्ययावत करण्याचे निर्देश दिले. अमेरिका आणि इस्रायलच्या भौतिक आणि अभौतिक मालमत्ता इराणी माºयाच्या टप्प्यात आणावी, असे त्यांनी सांगितले. म्हणजे केवळ लष्करी तळे, जहाजे अशी प्रत्यक्ष ठिकाणेच नव्हे, तर अन्य स्वरूपाची साधनेही लक्ष्य ठरू शकतात. नव्याने लष्करी किंवा दहशतवादी हल्ले झाले, तर ते संघर्ष केव्हा आणि कोणत्या अटींवर संपवायचा हे इराणच ठरवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

इराणी लष्कराचा इशारा

‘इस्रायलच्या दबावाखाली अमेरिकी अध्यक्षांनी पुन्हा या प्रदेशात साहस केले, तर युद्धाच्या ज्वाळा यापेक्षा कितीतरी मोठ्या भूभागाला वेढून टाकतील,’ असे इराणी लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमीनिया यांनी म्हटले. इराणचे सैन्य ‘अथकपणे आपली युद्धसज्जता वाढवत आहे,’ असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या नव्या हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे.

काय घडतेय आखातात?

होर्मुझमध्ये सुरुंगांना धडकून तेलवाहू जहाजांना आग लागल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने केला आहे. मात्र कोणत्याही सागरी प्राधिकरणाने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही. ओमानने काल एका जहाजावरील २५ खलाशांना सुरक्षित बाहेर काढले. सौदी अरेबियाच्या नागरी संरक्षण यंत्रणेने नैऋत्येकडील जझान प्रांत आणि नजरान भागात काही काळासाठी धोक्याचा इशारा दिला होता. सौदीने रियाधसह अनेक भागांवरील ड्रोन पाडल्याचेही म्हटले आहे.

युद्ध कसे सुरू झाले?

फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. त्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. त्यानंतर इराणने इस्रायल आणि पश्चिम आशियातील अमेरिकी तळांवर प्रतिहल्ले केले. मार्च २०२६ मध्ये अली खामेनेई यांचे पुत्र मोजताबा खामेनेई यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाली. पदभार घेतल्यापासून ते प्रसारमाध्यमांपासून बºयापैकी दूर राहिले आहेत; त्यामुळे त्यांचा हा थेट आदेश अधिकच लक्षवेधी ठरतो. मार्चपासून होर्मुझची सामुद्रधुनी हा संघर्षाचा केंद्रबिंदू बनली आहे. जगातील तेलवाहतुकीचा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने तिथल्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम जागतिक तेलपुरवठ्यावर आणि किमतींवर होतो.

Read About : Binance Crypto Hack – क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा! ‘बायनान्स’मधून 6.3 अब्ज डॉलर लंपास
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.