आरबीआयचा अहवाल : सप्टेंबरमध्ये ३७ टक्क्यांची घट; ४.३४ अब्ज डॉलरवर गुंतवणूक वचनबद्धता
Indian Companies Overseas Investment : मुंबई : भारतीय कंपन्यांच्या परदेशातील गुंतवणूक वचनबद्धतेत सप्टेंबर महिन्यात जवळपास ३७ टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ६.८७ अब्ज डॉलर असलेली ही वचनबद्धता सप्टेंबरमध्ये ४.३४ अब्ज डॉलरवर आली. परदेशातील गुंतवणुकीसाठी भारतीय कंपन्यांनी दिलेल्या हमींमध्ये मोठी घट झाल्याने एकूण गुंतवणूक वचनबद्धतेवर परिणाम झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
आरबीआयने २०२६ मधील परदेशातील थेट गुंतवणुकीसंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, भारतीय कंपन्यांनी परदेशातील गुंतवणुकीसाठी दिलेल्या हमींचे मूल्य ऑगस्टमधील २.२९ अब्ज डॉलरवरून सप्टेंबरमध्ये ५२८.२१ दशलक्ष डॉलरवर घसरले. म्हणजेच, त्यात जवळपास ७७ टक्क्यांची घट झाली.
आरबीआयने ही आकडेवारी तात्पुरती असून, अधिकृत बँकांकडून ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अहवालांनुसार त्यात बदल होऊ शकतो, असे नमूद केले आहे. परदेशातील गुंतवणूक वचनबद्धतेमध्ये समभाग गुंतवणूक, कर्ज आणि हमी यांचा समावेश होतो.
भारतीय कंपन्या त्यांच्या परदेशातील उपकंपन्या तसेच संयुक्त उपक्रमांसाठी या माध्यमांतून आर्थिक बांधिलकी स्वीकारतात. मात्र, या वचनबद्धतेची संपूर्ण रक्कम त्याच महिन्यात प्रत्यक्ष परदेशात पाठविली जातेच, असे नाही.
समभाग गुंतवणुकीतही घट
परदेशातील कंपन्यांमध्ये समभागांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेतही घट नोंदविण्यात आली. ऑगस्टमध्ये ही रक्कम ४.११ अब्ज डॉलर होती. सप्टेंबरमध्ये ती ३.२७ अब्ज डॉलरवर आली. त्यामुळे महिनाभरात या गुंतवणुकीत सुमारे २० टक्क्यांची घट झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याशी तुलना करता, समभाग गुंतवणुकीच्या वचनबद्धतेत सकारात्मक वाढ दिसून आली. सप्टेंबर २०२५ मध्ये ही रक्कम २.५९ अब्ज डॉलर होती. त्या तुलनेत सप्टेंबर २०२६ मध्ये सुमारे २६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कर्जविषयक वचनबद्धतेत वाढ
एकीकडे हमी आणि समभाग गुंतवणुकीत घट झाली असताना, परदेशातील गुंतवणुकीसाठी भारतीय कंपन्यांनी दिलेल्या कर्जविषयक वचनबद्धतेत वाढ झाली. ऑगस्टमधील ४७३.५२ दशलक्ष डॉलरवरून ही रक्कम सप्टेंबरमध्ये ५४९.१६ दशलक्ष डॉलरवर पोहोचली. त्यात जवळपास १६ टक्क्यांची वाढ झाली. एकूण परदेशी गुंतवणूक वचनबद्धतेतील घसरणीमागे सर्वच प्रकारच्या गुंतवणुकीतील घट कारणीभूत नसून, प्रामुख्याने हमींच्या रकमेत झालेली मोठी घट हे प्रमुख कारण असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
निव्वळ परकीय गुंतवणुकीत भर
भारतातील निव्वळ थेट परकीय गुंतवणुकीच्या (नेट एफडीआय) प्रवाहात वाढ झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या ऑक्टोबर २०२६ च्या बुलेटिननुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतातील निव्वळ थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ १३.८ अब्ज डॉलरवर पोहोचला. मागील वर्षातील याच कालावधीत तो ९.६ अब्ज डॉलर होता. परदेशातील गुंतवणुकीचा वेग मंदावणे आणि भारतात होणारी एकूण थेट परकीय गुंतवणूक तुलनेने अधिक राहणे, या दोन्ही बाबींमुळे निव्वळ परकीय गुंतवणुकीच्या प्रवाहाला आधार मिळाल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Supreme Court on Digital Fraud- डिजिटल फसवणूक बळींना निष्काळजी बँकांनीच द्यावी भरपाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.