Ad Advertisement Ad Advertisement

Land Revenue Collection – जमीन महसूल, गौण खनिजातून जेमतेम वसुली !

सात महिन्यांत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३६.६७ टक्के महसूल जमा

छत्रपती संभाजीनगर : Land Revenue Collection – जमीन महसूल आणि गौण खनिजातून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा करण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षातील ३१ ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३६.६७ टक्केच वसुली झाली आहे. सात महिन्यांत १८८ कोटी ५४ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी अवघे ६९ कोटी १४ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर शहरात वसुलीचे प्रमाण अवघे ७.३३ टक्के असून, सोयगाव तालुक्याने ५९.६९ टक्के वसुलीसह जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

राज्य शासनाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत म्हणून जमीन महसूल आणि गौण खनिज महसुलाकडे पाहिले जाते. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला या दोन्ही माध्यमांतून एकूण १८८ कोटी ५४ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये जमीन महसुलातून ६८ कोटी ५४ लाख ६१ हजार रुपये, तर गौण खनिजातून १२० कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून महसूल वसुलीला गती देणे अपेक्षित असताना सात महिन्यांतील आकडेवारी निराशाजनक आहे. जमीन महसुलातून केवळ १२ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपये वसूल झाले आहेत. ही वसुली निर्धारित उद्दिष्टाच्या १८.७६ टक्के आहे. दुसरीकडे, गौण खनिजातून ५६ कोटी २८ लाख ५३ हजार रुपये जमा झाले असून, वसुलीचे प्रमाण ४६.९० टक्के आहे. त्यामुळे जमीन महसूल वसुलीचा वेग विशेषत: मंदावल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय आकडेवारी पाहता छत्रपती संभाजीनगर शहराची कामगिरी सर्वाधिक निराशाजनक आहे. शहरासाठी ५३ कोटी ९३ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात अवघे ३ कोटी ५९ लाख रुपये जमा झाले आहेत. ग्रामीण भागातही २९.७१ टक्केच वसुली झाली आहे. पैठण तालुक्याने ५०.७९ टक्के वसुली केली असून, जिल्ह्यात दुसरे स्थान मिळविले आहे. गंगापूर तालुक्यात ३८.८९ टक्के वसुली झाली आहे. सोयगाव तालुक्याने ५९.६९ टक्के वसुलीसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मात्र, कन्नडमध्ये १५.२५ टक्के, सिल्लोडमध्ये १४.३७ टक्के आणि खुलताबादमध्ये २२.८१ टक्केच वसुली झाली आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.


दोन वर्षांपासून परिस्थिती कायम

गेल्या काही वर्षांपासून महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमीन महसूल आणि गौण खनिज वसुलीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप काही महिने शिल्लक असले तरी उर्वरित कालावधीत निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल यंत्रणेला वसुलीचा वेग वाढवावा लागणार आहे.


तालुकानिहाय जमीन महसूल व गौण खनिज वसुली

३१ ऑक्टोबर २०२६ अखेरची आकडेवारी (रक्कम लाख रुपयांत)

तालुकाउद्दिष्टवसुली टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर शहर५३९३.०३३५९.३९७.३३
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण२९४१.३६८७३.८७२९.७१
पैठण२२२३.८३११२९.५०५०.७९
फुलंब्री ९१६.०९२५७.२६२८.०८
वैजापूर १९५५.०१५६६.७३२८.९९
गंगापूर १६५५.४१६४३.७८३८.८९
खुलताबाद ४३२.४८९८.६४२२.८१
कन्नड १३७३.१४२०९.३८१५.२५
सिल्लोड १७०८.७६२४५.६०१४.३७
सोयगाव २५५.५९१५२.५५५९.६९
जिल्हास्तरीय ००२३४१.६६००
एकूण १८८५४.६१६९१४.३६३६.६७

Read About : Devendra Fadnavis celebrates Diwali with farmers – सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.