Nana Patekar Charity : मध्यंतरी नाना पाटेकर दीड कोटी रुपयांची एक गाडी घेणार होते. गाडी घेण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी दुष्काळाच्या दाहकतेची एक सविस्तर बातमी एका वाहिनीवर बघितली आणि ते अस्वस्थ झाले. रात्रभर तळमळत काढल्यानंतर त्यांनी सकाळी त्यांच्या सहायकाला सांगितलं, ‘गाडी नको, त्या पैशांचे पंधरा-पंधरा हजारांचे चेक काढ आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाटून टाक.’
डॉ. वा. ना. तुंगार हे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. ते स्वत: दिव्यांग होते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दिव्यांगासाठी मोठं काम उभं केलं. दिव्यांगासाठीच्या त्यांच्या तीन शाळा आहेत. अशा मुलांचं पालन-पोषण करणं, त्यांचा शैक्षणिक विकास करणं हे मोठं आव्हान असतं. त्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते ती मोठ्या निधीची. अशा कामासाठी समाजाकडून निधी उभा करणं मोठं जिकिरीचं काम असतं. तुंगारांना त्यांच्या एका जवळच्या मित्रानं सांगितलं की, ‘तू नाना पाटेकरांना भेट. तुझं काम त्याला आवडलं तर तो नक्की काही मदत करू शकेल.’
तुंगारांनी मोठ्या प्रयत्नानं नानांची भेट घेतली. त्यांना संस्थेची माहिती देऊन ‘एकदा या दिव्यांग मुलांच्या भेटीला या,’ असं निमंत्रण दिलं. संकोची स्वभावामुळं त्यांची नानांकडं काही मागण्याची हिंमतच झाली नाही. ‘बघतो’ या एका शब्दात नानांनी विषय संपवला. तुंगार रिकाम्या हातानं परत आले. मध्ये काही महिने गेले आणि अचानक एक दिवस नाना संस्थेत हजर. सोबत मुलांसाठी खाऊ, खेळणी आणि बरंच काही!
दीड-दोन तास नाना या मुलांत मूल बनून रमले. सगळ्यांना आनंद वाटत ते निघून गेले पण यावेळीही जाताना रिकाम्या हातानंच गेले. नाना संस्थेला काही आर्थिक सहाय्य करतील अशी तुंगारांची अपेक्षा होती. संस्थेची अवस्था नाजूक असल्यानं आणि नाना स्वत: इथवर आल्यानं त्यांना ते मदत करतील असं वाटत होतं. शेवटी त्यांची इच्छा म्हणून ते शांत राहिले.
मध्ये थोडा काळ उलटला आणि मुंबईचा एक मोठा उद्योजक एका आलिशान गाडीतून तुंगारांना शोधत शोधत आला. त्यानं सांगितलं, ‘मला तुमच्या संस्थेला देणगी द्यायची आहे.’ एका मोठ्या रकमेचा धनादेश त्यानं तुंगारांच्या हातात ठेवला. अनपेक्षिपणे एका अनोळखी माणसाकडून मिळालेलं हे दातृत्व पाहून तुंगार भारावून गेले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्या बांधकाम उद्योजकानं सांगितलं की, ‘नाना पाटेकर यांना आम्ही एका कार्यक्रमाला बोलावलं आहे. त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडून मानधन घेणार नाही पण मला जे द्यायची इच्छा आहे ते त्या संस्थेला नेऊन द्या. म्हणून मी तुमच्याकडे आलो.’असे होते नाना पाटेकर! अभिनेता म्हणून आज त्यांच्यावर अनेक लेख प्रकाशित होतील पण त्यांच्यातील माणुसपण सर्वोच्च होतं. त्यांच्या रोखठोकपणाचे, विक्षिप्तपणाचे अनेक अनुभव अनेक जण सांगतील पण त्यांच्यातील संवेदनशीलता, त्यांच्यातील चांगुलपण हे कोणत्याही तराजूत मोजता न येणारं आहे.
मध्यंतरी नाना पाटेकर दीड कोटी रूपयांची एक गाडी घेणार होते. गाडी घेण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी दुष्काळाच्या दाहकतेची एक सविस्तर बातमी एका वाहिनीवर बघितली आणि ते अस्वस्थ झाले. रात्रभर तळमळत काढल्यानंतर त्यांनी सकाळी त्यांच्या सहायकाला सांगितलं, ‘गाडी नको, त्या पैशांचे पंधरा-पंधरा हजारांचे चेक काढ आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वाटून टाक.’ त्यातूनच ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना झाली. कित्येकांना जिवदान देण्याचं काम नानांच्या या संस्थेनं केलं. कित्येक शेतकऱ्यांनी गळफास घेण्यासाठी घेतलेला दोर तसाच खाली ठेवला.
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नानांच्या टीमनं घेतली. ज्या शेतकऱ्यांना ते वाचवू शकले नाहीत त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. त्यांच्या मुलांचे पालकत्त्व स्वीकारले. नानांनी त्यांचं सगळं वजन वापरून निधी संकलन सुरू केलं होतं. समाजातील अनेकांचं दातृत्व त्यातून दिसून आलं.
१९९९ ला कारगिल युद्ध झालं. त्यावेळी नानांनी तेव्हाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना फोन करून ‘मला युद्धावर जायचंय’ असं सांगितलं. ‘प्रहार’ सिनेमासाठी त्यांनी तीन वर्ष सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं होतं. नाना अनेकदा सांगायचे की ‘आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बोफोर्स नाही तर आपला सीमेवरचा जवान आहे.’ नाना फक्त एक व्यक्ती नाही तर एक संस्था होती. त्यामुळं देशभक्ती त्यांच्या श्वासाश्वासात होती. संरक्षण मंत्र्यांच्या विशेष परवानगीनं त्यांनी तब्बल साठ दिवस सीमेवर सेवा बजावली. नाना पाटेकर यांच्या जाण्यानं सामान्य शेतकऱ्यांच्या घरात सुतकाचं वातावरण आहे. नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात म्हणतात, ‘दोन दिवसांपूर्वीच नानांशी दुष्काळासंदर्भात चर्चा झाली होती. एका गरीब मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी फोन केला होता. ते काम आम्ही केले. नानांना महाराष्ट्र घडवायचा होता. भारताच्या प्रगतीविषयी त्यांची काही स्वप्नं होती. सर्व शेतकऱ्यांना आपण आधार देऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यांना शासनाकडून आणि आपल्याकडून अधिकाधिक मदत करू, असं ते तळमळीनं म्हणाले होते.’
घनश्याम पाटील
संपर्क : ७०५७२९२०९२
Read About : Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.