लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी नेटवर्कप्रकरणी एनआयएची कारवाई; हजरतबल परिसरातील मालमत्ता UAPA अंतर्गत जप्त
नवी दिल्ली : NIA Action राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा शी संबंधित एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत, एनआयएने श्रीनगरमधील एका तस्कराची निवासी मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेचा वापर पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित निवारा देण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या घातक साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी केला जात होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे.
कोणाची मालमत्ता जप्त?
जप्त करण्यात आलेली निवासी मालमत्ता श्रीनगरमधील हजरतबल परिसरातील दानिहामा गावातील (खसरा क्र. ३१५) आहे. ही मालमत्ता गुलाम मोहम्मद मीर ऊर्फ मामा गॅस याच्या मालकीची आहे.ही जप्ती बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा १९६७ च्या कलम २५ अन्वये करण्यात आली आहे. एनआयएच्या महासंचालकांकडून औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर ही कडक कारवाई करण्यात आली.
प्रकरणाचा इतिहास
या गुन्ह्याची नोंद सुरुवातीला ३१ मार्च रोजी झकुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नंतर हा तपास एनआयएने आपल्या हाती घेतला. ६ एप्रिल रोजी एनआयएच्या पथकाने मीरच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान तिथे अबू हुरायरा आणि खुबाइब हे दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याचे उघडकीस आले होते.
पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क आणि जप्त केलेले साहित्य
तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाम मोहम्मद मीर याने जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून आपले घर पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून उपलब्ध करून दिले होते. धाड टाकली तेव्हा एनआयएला घरातून स्फोटक सदृश पदार्थ, संशयास्पद डिजिटल उपकरणे आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे/साहित्य मिळून आले होते, जे जप्त करण्यात आले आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, स्थानिक ओव्हर ग्राउंड वर्कर आणि पाकिस्तानमध्ये बसलेले लष्कर-ए-तैयबाचे हँडलर्स यांच्यात समन्वय साधून हे संपूर्ण जाळे चालवले जात होते. काश्मीर खोऱ्यातील सरकारी कार्यालये, सुरक्षा दलांचे कॅम्प आणि सर्वसामान्य नागरिकांवर मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांना रसद पुरवणे, निवारा देणे आणि प्रवासाची गुप्त सोय करणे ही या नेटवर्कची मुख्य जबाबदारी होती.
Read About: Chhatrapati Sambhajinagar Weapon – मुलासाठी शिक्षक आईने खोली बदलली तरीही तो गुन्हेगारांच्याच संगतीत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.