Ad Advertisement Ad Advertisement

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर 55 लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात

जयपूर टोलनाक्याजवळ करमाड पोलिसांची पहाटे कारवाई; ३५.१९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि २० लाखांचा आयशर ट्रक जप्त

करमाड : Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरून अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरीत्या वाहतूक केला जात असलेला प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला करमाड पोलिसांनी जप्त केला. जयपूर टोलनाका एक्झिट पॉइंटजवळ बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे केलेल्या कारवाईत ३५ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा-पानमसाला आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण ५५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इस्माईल खैराती शेख (वय ३६) आणि अकिल खलील शेख (वय ३६) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांना अमरावतीहून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जयपूर टोलनाक्याजवळ सापळा रचला.

पहाटे साडेपाचच्या सुमारास संशयित आयशर ट्रक (एमएच ४६ बीएफ ४२३५) तेथे आला. पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून ट्रक अडवला आणि तपासणी केली.

ट्रकमध्ये ३० हजारांहून अधिक पुडे

तपासणीदरम्यान ट्रकमध्ये बाजीराव सुगंधित पानमसाल्याचे १५ हजार ३०० पुडे आढळले. त्यांची किंमत ३० लाख ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या प्रकारच्या सुगंधित पानमसाल्याचे १५ हजार ३०० पुडे, ज्यांची किंमत ४ लाख ५९ हजार रुपये आहे, तेही जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीत हा माल अमरावतीतील जावेद हारुण मेमन याच्याकडून घेतल्याचे आणि छत्रपती संभाजीनगरातील अंजिठा किराणा स्टोअर्सचे मालक सय्यद वाजेद सय्यद फारुख यांच्या सांगण्यावरून वाहतूक केल्याचे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींविषयीचे आरोप तपासाधीन आहेत.

या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.

पोलिसांच्या पथकाचा कारवाईत सहभाग

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी मदेवाड, अरुण राघुडे, जयसिंग नांगलोत, शत्रुघ्न मडावी, रामेश्वर खंडागळे, कपूर चव्हाण, अमित वाघिरे आणि राजू महेर यांचा सहभाग होता.

Read About : Cryonics Mumbai Case – भविष्यात जिवंत होण्याच्या आशेने मुंबईतील कुटुंबाने 4 वर्षे मृतदेह ठेवला फ्रीझरमध्ये
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.