Ad Advertisement Ad Advertisement

Indoor Air Pollution: सुगंधी क्लीनर्स मुळे फुफ्फुसांना धोका? संशोधनात काय आढळले

सुगंधी क्लीनर्समधील टर्पिन्स आणि ओझोनच्या रासायनिक प्रक्रियेतून घरात धोकादायक नॅनोपार्टिकल्स तयार होण्याचा संशोधकांचा इशारा

वॉशिंग्टन : Indoor Air Pollution घर लख्ख पुसल्यानंतर घरात येणारा लिंबू, चीड (पाइन) किंवा फुलांचा ‘ताजा’ सुगंध प्रत्येकालाच आवडतो. पण हाच सुगंध घरातील लोकांच्या फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन २६ सप्टेंबरला ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आले असून ‘सायन्स डेली’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने ते प्रसिद्ध केले आहे.

आपण वापरत असलेल्या सुगंधी क्लीनर्स आणि फिनाईलमध्ये ‘टर्पिन्स’ नावाचे रसायन असते. याच रसायनामुळे लिंबू किंवा चीडसारखा फ्रेश वास येतो. जेव्हा आपण हे क्लीनर्स वापरतो, तेव्हा हे टर्पिन्स हवेत मिसळतात. त्याचवेळी आपल्या खिडक्या-दारांतून बाहेरची हवा आणि ‘ओझोन’ वायू घरात येतो. हवेतील ओझोन व क्लीनरमधील टर्पिन्स यांची आपसात रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेतून अगदी सूक्ष्म व डोळ्यांना न दिसणारे ‘अब्जावधी नॅनोपार्टिकल्स’ तयार होतात. हे कण इतके बारीक असतात की, तुम्ही श्वास घेताच काही मिनिटांत ते फुफ्फुसाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतात आणि थेट रक्तातही मिसळू शकतात. डॉ. ब्रँडन ई. बूर आणि त्यांच्या पथकाने हे संशोधन केले आहे.

वाहनांच्या धुराइतके प्रदूषण घरात

संशोधकांच्या प्रयोगात आढळले की, सुगंधी क्लीनर वापरल्यानंतर एका बंद खोलीत प्रति घन सेंटीमीटर तब्बल १० कोटींहून अधिक नॅनोपार्टिकल्स तयार होतात! थोडक्यात तुम्ही एखाद्या प्रचंड वाहतुकीच्या कोंडीत उभे राहून श्वास घेत आहात, इतके प्रदूषण घरातच तयार होते. हे कण श्वासनलिकेत जमा होतात. यामुळे श्वास घेताना जळजळ होणे, फुफ्फुसाला सूज येणे, दमा उफाळून येणे व दीर्घकाळ फुफ्फुसाचे गंभीर विकार जडण्याचा धोका असतो.

हे सोपे उपाय करा

घर स्वच्छही राहिले पाहिजे आणि आरोग्यही जपले गेले पाहिजे, यासाठी संशोधकांनी काही सोपे उपाय सुचवले आहेत. बाजारात मिळणाऱ्या सुगंधी क्लीनर्सऐवजी बिगर-सुगंधी किंवा कमी वास असलेली उत्पादने निवडा. फिनाईल, रूम फ्रेशनर आणि स्प्रे अशा अनेक सुगंधी वस्तू एकत्र वापरणे टाळा. लादी किंवा घर पुसताना घरातील खिडक्या-दारे उघडी ठेवा किंवा एग्झॉस्ट फॅन चालू ठेवा, जेणेकरून विषारी कण बाहेर निघून जातील.

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.