आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिन विशेष
छत्रपती संभाजीनगर : Snakebite Treatment :पावसाळा, शेतीची कामे आणि ग्रामीण भागातील वाढती सर्पदंशाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा तातडीने योग्य वैद्यकीय उपचार घेणे हाच जीव वाचविण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. सर्पदंशाच्या ठिकाणी कापाकापी करणे, विष तोंडाने शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा घट्ट दोर बांधणे यांसारख्या पारंपरिक पद्धती धोकादायक ठरू शकतात.
‘आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिना’निमित्त सर्पदंश प्रतिबंध, योग्य प्रथमोपचार आणि वेळेत उपचार याबाबत व्यापक जनजागृती सुरू करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये २६, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ३९ सर्पदंश प्रकरणांची नोंद झाली आहे. संबंधित कालावधीत एकूण ६५ प्रकरणे नोंदली गेल्याने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि शक्य तितक्या लवकर योग्य आरोग्य संस्थेत पोहोचवणे आवश्यक आहे. रुग्णाला चालत नेण्याऐवजी शक्य असल्यास वाहनातून नेणे, दंश झालेला अवयव शक्य तितका स्थिर ठेवणे आणि उपचारासाठी विलंब न करणे महत्त्वाचे आहे. दंशाच्या जागी कापू नये, विष शोषू नये, घट्ट बांधू नये आणि घरगुती उपचारांमध्ये वेळ घालवू नये. सर्पदंश हा वैद्यकीय आपत्कालीन प्रकार मानून डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.
‘सर्पमित्र’ जनजागृतीचे दूत
‘साप चावल्यातून वाचलेले आणि सर्पमित्र: बदलाचे प्रणेते’ या थीमच्या माध्यमातून सर्पदंशातून बचावलेल्या व्यक्ती आणि अधिकृत मान्यताप्राप्त सर्पमित्रांना जनजागृतीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. सर्पमित्रांची भूमिका प्रामुख्याने ‘प्रतिबंध करा- माहिती द्या- मार्गदर्शन करा- संदर्भ द्या’ अशी राहणार आहे. मात्र, वैद्यकीय निदान, उपचार किंवा संपदंशविरोधी विषनाशक (एएसव्ही) देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार नाही. सर्पमित्रांचा सहभाग घेताना वन, वन्यजीव विभागाकडील मान्यता किंवा नोंदणी तपासणे आवश्यक आहे.
कोणाला अधिक धोका?
शेतात काम करणारे शेतकरी व मजूर, वन आणि वन्यजीव कर्मचारी, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यामध्ये विशेष जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे आणि शेतकरी गट यांनाही मोहिमेत सहभागी करून घेण्यात येत आहे. सर्पदंशाच्या वेळी काही मिनिटेही मौल्यवान ठरू शकतात. त्यामुळे मांत्रिक, झाडफुंक, औषधी वनस्पती किंवा इतर घरगुती उपचारांच्या नावाखाली रुग्णाला रुग्णालयापासून दूर ठेवणे टाळणे गरजेचे आहे. वेळेत योग्य उपचार मिळणे हीच गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका कमी करण्याची महत्त्वाची संधी आहे.
Read About : AI Job Threat 2026 : पुढील ५ वर्षांत AI मुळे तुमची नोकरी जाईल का?
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.