टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; चौघांना पोलीस कोठडी
Tiger Shroff firing case: मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर अनिल पंडित याला या प्रकरणात ‘वॉण्टेड’ आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुरुवारी पोलिसांनी न्यायालयाला ही माहिती दिली. न्यायालयाने अटक केलेल्या चौघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेला आणि अमेरिकेतून कारवाया करत असल्याचे मानला जाणारा अनिल पंडित याने, रविवार, १८ ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वीकारली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी कुणाल (२१) आणि सुमित (१९) हे हरयाणातील सोनीपत जिल्ह्याचे रहिवासी असून उत्तर प्रदेशच्या राधा (२३) आणि बबिता (२३) यांना येथील एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार अनिल पंडितच्या सूचनेवरून करण्यात आला होता आणि त्याला या प्रकरणात ‘वॉण्टेड’ आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे.
तपास पथकाने या चौघांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सांगितले की, या प्रकरणातील आधी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींसोबत हे चौघेही कटात सक्रियपणे सहभागी होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या चौघांनीच हल्लेखोरांना शस्त्र पुरवले होते. अनिल पंडितच्या सूचनेवरून कुणाल आणि सुमित यांनी अमृतसरमधून एक पिस्तुल आणि २० काडतुसे मिळवली होती, तर राधा आणि बबिता यांनी मुंबईत येऊन ते शस्त्र इतर कटातील साथीदारांकडे सोपवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
२६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
बचाव पक्षाचे वकील अजिंक्य मिरगुळ आणि सत्यव्रत जोशी यांनी कोठडीच्या मागणीला विरोध केला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, या चौघांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही आणि त्यांना केवळ संशयावरून अटक करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने या चौघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बनावट ओळखपत्रांचा आरोपींकडून वापर; टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी खुलासा
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून हल्ल्यापूर्वी आरोपींनी मुंबईतील चकाला परिसरातील आर. आर. रेसिडेन्सी या बजेट हॉटेलमध्ये बनावट ओळखपत्रांच्या आधारे मुक्काम केला होता. याच हॉटेलच्या खोलीत शस्त्र हाताळताना एका बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याची माहितीही समोर आली आहे.
रेहान अन्सारी (१८) आणि फूल सिंग (१८) यांनी १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. त्यांनी अनुक्रमे अंकित आणि रणदीप या बनावट नावांनी खोली बुक केली. यासाठी बनावट आधारकार्डांचा वापर करण्यात आला होता. हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांनी चेकआऊटची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. पोलिसांनी हॉटेलचे बुकिंग रजिस्टर, संबंधित कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपी दररोज काही तासांसाठी हॉटेलबाहेर जात असल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्या खोलीत शस्त्रे हाताळताना मिसफायर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच १७ ऑक्टोबर रोजी आरोपींनी जंगल परिसरात जाऊन गोळीबाराचा सराव केल्याची माहितीही समोर आली आहे.
महत्वाचे मुद्दे
Read About : Tiger Shroff Mumbai Car Firing Incident 18 Oct: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.