चोप दिल्यावर २४ तासांनी आर्थिक गुन्हे शाखेत केले हजर : तोपर्यंत सिटी चौक ठाण्यात अपहरणाचा गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : 30-30 Scam : राज्यातील बहुचर्चित ३०-३० घोटाळ्यातील एका आरोपीचे चौघांनी कारमध्ये कोंबून फिल्मी स्टाइल अपहरण केले. २४ तासांनतर त्याला अपहरणकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर केले. मात्र, तोपर्यंत अपह्रताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १६ सप्टेंबरला दुपारी सायंकाळी सव्वापाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही थरारक घटना घडली.
नितीन कल्याण चव्हाण (३४, रा. राजेशनगर, बीड बायपास, देवळाई चौक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ३०-३० घोटाळ्यातील आरोपी असून त्याला आता आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तर, दीपक बाबू चव्हाण, जयलाल बाबू चव्हाण, अजय दीपक चव्हाण (सर्व रा. जटवाडा) आणि एका अनोळखी, अशी अपहरण करणाऱ्य आरोपींची नावे आहेत.
पायल नितीन चव्हाण (२६) या अपहरण प्रकरणाच्या फिर्यादी आहेत. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास नितीन चव्हाण हा महसूल विभागातील काही कामासाठी दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. दरम्यान, सायंकाळी सव्वापाच वाजता चौघांनी त्याला बळजबरीने एमएच २० एचएन ९०६८ या पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमध्ये कोंबून अपहरण केल्याची माहिती आलासिंग चव्हाण यांनी त्याचा भाऊ सतीश चव्हाण यांना दिली. हा प्रकार नितीनच्या पत्नीला समजल्यार त्यांनी तत्काळ सिटी चौक ठाणे गाठून तक्रार दिली.
‘लेकरांना सांभाळून ठेव, ते काहीही करू शकतात’
या अपहरणकर्त्यांबद्दल नितीन चव्हाणला आधीच शंका होती. त्याने पत्नी पायल यांना, लेकरांना सांभाळून ठेव, ते लोक काहीही करू शकतात, अशी भीती बोलून दाखवली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. अपहरण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करीत आहेत.
आरोपी जयलाल पोलिसांच्या जाळ्यात; १९ तारखेपर्यंत कोठडी
या अपहरणात सिटी चौक पोलिसांनी मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या जयलाल बाबू चव्हाण याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता जयलालकडे सखोल चौकशी करत असून, फरार असलेले इतर आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
आरोपी नितीनवर १.५९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला नितीन चव्हाण याने ३०-३० घोटाळ्यातील मुख्य आरोपीसोबत काम केले आहे. तो या घोटाळ्यातील प्रमुख एजंटांपैकी एक आहे. त्याच्या खात्यावर पाच जणांचे सुमारे १ कोटी ५९ लाख रुपये आलेले आहेत. त्यातील एकाचे ८९ लाख, दुसऱ्याचे ६० लाख आणि अन्य तिघांचे १० लाख रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस करीत आहेत.
Read About : AI Scam : एआय फसवणूक
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.