Ad Advertisement Ad Advertisement

Mitochondria Research : पेशींमधील ऊर्जा केंद्रांना मिळणार नवे कवच; गंभीर आजारांवरील उपचारांना आशा

इटलीतील संशोधकांचे महत्त्वपूर्ण संशोधन; Metal-Organic Frameworks चे आवरण चढवूनही माइटोकॉन्ड्रियांची ऊर्जा निर्मिती कायम

मिलान : Mitochondria Research मानवी पेशींना ऊर्जा पुरवणाऱ्या माइटोकॉन्ड्रिया या सूक्ष्म घटकांवर त्यांच्या कार्यात अडथळा न आणता विशेष पदार्थाचे आवरण चढवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. इटलीतील संशोधकांनी केलेल्या या प्रयोगामुळे माइटोकॉन्ड्रियाशी संबंधित दुर्मीळ आजारांवरील उपचारांसाठी भविष्यात नवे पर्याय विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी’ (जेएसीएस) या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

माइटोकॉन्ड्रिया पेशींना आवश्यक ऊर्जा निर्माण करतात. त्यांचे कार्य बिघडल्यास मेंदू आणि स्नायूंसारख्या अधिक ऊर्जा लागणाऱ्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. अशा अनेक आजारांवरील प्रभावी उपचार अद्याप मर्यादित आहेत.

या समस्येवर संशोधन करण्यासाठी इटलीतील कार्लो बेस्टा न्यूरोलॉजिकल संस्थेतील (एफआयएनसीबी) आणि मिलान पॉलिटेक्निकमधील संशोधकांनी एकत्र काम केले. त्यांनी मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स (एमओएफ) या प्रगत पदार्थांचा वापर केला. माइटोकॉन्ड्रिया नाजूक असल्यामुळे त्यांच्यावर आवरण चढवताना त्यांचे कार्य बिघडण्याचा धोका होता. मात्र, संशोधकांनी अत्यल्प प्रमाणात एमओएफपदार्थ त्यांच्या पृष्ठभागावर लावण्याचे तंत्र विकसित केले. चाचण्यांमध्ये आवरण चढवलेल्या माइटोकॉन्ड्रियांची ऊर्जा निर्मिती सुरू राहिल्याचे दिसले.

भविष्यात माइटोकॉन्ड्रिया प्रत्यारोपणाला मदत?

या आवरणाचे वैशिष्ट्य म्हणजे गरजेनुसार त्याचे गुणधर्म बदलता येण्याची शक्यता. त्यामुळे निरोगी माइटोकॉन्ड्रिया बिघडलेल्या पेशींमध्ये पोहोचवण्याच्या प्रायोगिक प्रक्रियेत भविष्यात मदत होऊ शकते. संशोधकांच्या मते, विशेष आवरणामुळे माइटोकॉन्ड्रिया पेशींमध्ये हस्तांतरित करणे आणि त्यांचा पेशींशी संपर्क सुधारणे शक्य होऊ शकते. मात्र, प्रत्यारोपणादरम्यान आवरणयुक्त माइटोकॉन्ड्रिया अधिक प्रभावी ठरतात का, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

मार्को डीआमाटो यांच्या संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे संशोधन झाले. इटलीच्या आरोग्य मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून संशोधनाला मदत झाली. या तंत्राचा वैद्यकीय उपचारांमध्ये वापर करण्यापूर्वी अधिक संशोधन आवश्यक आहे.

Read About: Moon’s Two Sides Mystery Solved : चंद्राच्या दोन वेगवेगळ्या बाजूंचे गूढ उकलले, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे लाव्हाचे असमान वहन

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.