तीन दशकांची परंपरा असलेल्या गेमिंग स्टुडिओबाबत खळबळजनक वृत्त; EA मधील टाळेबंदी आणि Mass Effect मालिकेच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण
न्यूयॉर्क : BioWare Studio Closure व्हिडिओ गेम जगतातून एक अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ३ दशकांपासून गेमर्सच्या मनावर राज्य करणारा आणि अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ गेम डेव्हलपमेंट स्टुडिओ ‘बायोवेअर’ कायमचा बंद करण्यात आला आहे. दिग्गज व्हिडिओ गेम प्रकाशक ‘इलेक्ट्रॉनिक आर्ट्स’ने (ईए) हा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे बायोवेअरचा बहुप्रतिक्षित आणि जगातील सर्वात लोकप्रिय सायन्स-फिक्शन मालिकांपैकी एक असलेला ‘मास इफेक्ट’ या गेमचा आगामी पाचवा भागही रद्द करण्यात आला आहे.
४०० कर्मचाऱ्यांवर गदा
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ‘ईए’ कंपनीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी सुरू असून सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘बायोवेअर’च्या ५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बायोवेअरचा भावूक संदेश
BioWare Studio Closure बायोवेअरने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आणि चाहत्यांचे आभार मानले. ”बायोवेअरच्या अनेक पिढ्यांनी मिळून जे काही घडवले, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो क्षण नेहमीच साजरा करण्यासारखा आहे. तुम्ही हे गेम्स खेळलात, पात्रांवर प्रेम केले आणि या आभासी जगाला आपलेसे केले, म्हणूनच हे गेम्स इतके खास बनू शकले,” असा भावूक संदेश बायोवेअरने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.
ट्रम्प यांच्या जावयाशी ५५ अब्ज डॉलर्सची डील
कॅलिफोर्निया स्थित ‘ईए’ कंपनीचा ५५ अब्ज डॉलर्सचा मोठा व्यवहार नुकताच पूर्ण झाला आहे. सौदी अरेबियाचा सॉव्हरेन वेल्थ फंड (पीआयएफ), सिल्व्हर लेक पार्टनर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांची ‘ॲफिनिटी पार्टनर्स’ यांनी मिळून हा खरेदीचा व्यवहार केला आहे. या पार्श्वभूमीवर बायोेवेअर बंद करण्याचा मोठा निर्णय धक्कादायक मानला जातो.
‘मास इफेक्ट’, ‘ड्रॅगन एज’चा सुवर्णकाळ अन् घसरण
सुवर्णकाळ : १९९५ मध्ये कॅनडामध्ये स्थापन झालेल्या आणि २००७ मध्ये ‘ईए’ने विकत घेतलेल्या बायोवेअरने ‘बाल्डुअर्स गेट’, ‘स्टार वॉर्स’, ‘ड्रॅगन एज’ आणि ‘मास इफेक्ट’ सारखे जगप्रसिद्ध रोल-प्लेइंग (आरपीजी) गेम्स देऊन गेमिंग विश्वात स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती.
अपयशाचा टप्पा: २०१९ मध्ये आणलेला ‘ॲन्थम’ हा मल्टीप्लेअर गेम फ्लॉप ठरला. त्यानंतर २०१७ मधील ‘मास इफेक्ट : अँड्रोमेडा’ आणि २०२४ मधील ‘ड्रॅगन एज : द व्हीलगार्ड’ या गेम्सनाही चाहत्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या काही वर्षांतील आर्थिक तोटा आणि नवीन रणनीतीमुळे अखेर या ऐतिहासिक स्टुडिओला कुलूप लावावे लागले आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो गेमर्सनी हळहळ व्यक्त केली आहे.
Read About : Pack-Man enzyme – निसर्गाने शोधला प्लास्टिक प्रदूषणावर उपाय पण…
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.