Ad Advertisement Ad Advertisement

9 psychological traps in Diwali shopping : दिवाळी खरेदीतील ९ मानसशास्त्रीय सापळे

बोनस आला, खिसा रिकामा!

9 psychological traps in Diwali shopping : दिवाळीत खरेदी जरूर करा, पण निर्णय तुमचा असू द्या, चाणाक्ष मार्केटिंगचा नाही. आकाश दिवे लावायचे आहेत, खिशाला आग नाही!

न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति।हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते॥
– सुभाषित

इच्छा उपभोगाने कधीच शांत होत नाही. अग्नीत तूप ओतले की ज्वाळा जशा अधिक भडकतात, तशी ती अधिकच वाढत जाते.
दिवाळी म्हणजे उत्साह, रोषणाई आणि खरेदी. पण याच काळात कंपन्या आपल्या मनाशी सर्वात हुशारीने खेळतात. पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या निखिलच्या खात्यात ₹50,000 चा दिवाळी बोनस जमा झाला. मेसेज पाहताच त्याने ठरवलं, “यंदाची दिवाळी जोरात साजरी करायची!” पुढच्या दहा दिवसांत त्याने भरपूर खरेदी केली. पण त्यातला प्रत्येक निर्णय खरंच त्याचा होता का? त्याचा खरेदीचा प्रवास टप्प्याटप्प्याने पाहूया.

बोनस म्हणजे फुकटचा पैसा?

पगारातून दरमहा बचत करताना निखिल प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतो. पण बोनसबद्दल त्याचं मत वेगळं होतं, “हा तर एक्स्ट्रा पैसा आहे!” बिहेविअरल फायनान्समध्ये याला ‘Mental Accounting’ म्हणतात. आपला मेंदू पैशाचे कप्पे करतो. पगार कष्टाचा, तर बोनस फुकटचा. प्रत्यक्षात बोनस हा वार्षिक उत्पन्नाचाच भाग असतो आणि त्याच्या प्रत्येक रुपयाची किंमत पगाराइतकीच असते.

मोबाईलच्या स्क्रीनवरचे सापळे

खरेदीची सुरुवात शॉपिंग ॲपवरून झाली. सुमारे ₹1,500 भरून घेतलेल्या वार्षिक मेंबरशिपचे पैसे वसूल करायचे, म्हणून गरज नसलेल्या वस्तूही कार्टमध्ये गेल्या. हा ‘Sunk Cost Fallacy’. गेलेले पैसे परत येत नाहीत, पण ते वसूल करण्याच्या नादात आपण नवा खर्च करत राहतो.

ॲप उघडताच ‘स्पिन द व्हील’ आलं. चाक फिरलं आणि 2 तासांसाठी 10% सूट जिंकल्याचा आनंद झाला. कूपन वाया जाऊ नये म्हणून ₹3,000 चे इअरबड्स आले, जुने व्यवस्थित चालत असतानाही. हा ‘Gamification Trap’. खरेदीला खेळाचं रूप दिलं की जिंकण्याचा आनंद गरजेवर मात करतो.

पुढे एका स्मार्टवॉचवर संदेश झळकला, ‘गेल्या 24 तासांत 5,000 लोकांनी खरेदी केलं.’ इतके लोक घेतायत म्हणजे चांगलंच असणार, असं म्हणत तेही कार्टमध्ये गेलं. हा ‘Social Proof’. गर्दी जिकडे जाते, तिकडे आपली गरजही वळते.

नवा फोन घ्यायचा निर्णय निखिलने आधीच घेतला होता. त्याने त्या फोनचं कौतुक करणारे व्हिडिओ पाहिले आणि बॅटरीच्या तक्रारी सांगणारे रिव्ह्यू सोयीस्करपणे टाळले. हा ‘Confirmation Bias’. निर्णय आधीच झालेला असतो, आपण फक्त त्याला पाठिंबा देणारे पुरावे शोधतो.

कपड्यांच्या सेलमध्ये ‘50% + एक्स्ट्रा 20% सूट’ पाहून त्याला वाटलं, 70% सूट मिळतेय. पण गणित वेगळं आहे. 10,000 च्या कपड्यांवर 50% सूट म्हणजे किंमत ₹5,000. त्यावर 20% म्हणजे आणखी ₹1,000 कमी. परिणामी एकूण सूट 60%, आणि भरावे लागतात 4,000, 3,000 नाहीत. हा ‘Framing Effect’. आकडे तेच, पण मांडणीमुळे ऑफर मोठी वाटते.

मॉलमधली जादू

शनिवारी निखिल कुटुंबासह मॉलमध्ये गेला. सुपरमार्केटमध्ये ड्रायफ्रूट्सचं फुकट सॅम्पल मिळालं. चव घेऊन रिकाम्या हाती पुढे जाणं त्याला अवघडल्यासारखं वाटलं, आणि 1,200 चा बॉक्स ट्रॉलीत आला. हा ‘Reciprocity Bias’. कोणी काही दिलं की त्याची परतफेड करण्याची भावना मनात जागी होते.

नंतर त्याने 6,000 चं जॅकेट ट्रायल रूममध्ये घालून पाहिलं. आरशात पाहताच ते ‘माझं’ वाटू लागलं आणि बजेट नसतानाही परत ठेवणं जमलं नाही. हा ‘Endowment Effect’. वस्तू हातात किंवा अंगावर आली की मेंदूला मालकीचा भास होतो. डॅनियल काहनेमन आणि रिचर्ड थेलर या नोबेल विजेत्यांच्या प्रसिद्ध प्रयोगात, हातात कॉफी मग मिळालेल्यांनी तो विकण्यासाठी, विकत घेणाऱ्यांच्या तुलनेत दुपटीहून जास्त किंमत मागितली. तीन तासांच्या खरेदीनंतर बिलिंगच्या रांगेत उभं असताना निखिलचा हात आपोआप काउंटरजवळच्या चॉकलेट्सकडे गेला. हा ‘Decision Fatigue’. सतत निर्णय घेऊन मेंदू थकतो आणि शेवटच्या क्षणी विचार न करता खरेदी होते. म्हणूनच दुकानदार अशा वस्तू नेमक्या तिथेच ठेवतात.

महिनाअखेरचा हिशोब

9 psychological traps in Diwali shopping : दिवाळी संपल्यावर निखिलने हिशोब मांडला. एकूण खर्च 90,000. बोनस तर संपलाच, वरचे 40,000 क्रेडिट कार्डच्या बिलात आले. हे बिल वेळेत पूर्ण भरलं नाही, तर व्याजाचे गणित भयंकर आहे. बहुतांश क्रेडिट कार्डवर दरमहा सुमारे 3.5%, म्हणजे वर्षाला 40% हून अधिक व्याज लागतं. प्रत्येक खरेदी त्या क्षणी हुशारीची वाटली होती. पण प्रत्यक्षात निर्णय मार्केटिंगने घेतले होते, निखिलने नाही. तुपाने अग्नी भडकावा, तशी एका खरेदीने दुसरीला वाट करून दिली होती.

तुम्ही काय कृती कराल?
  • बोनस हातात येताच आधी आपत्कालीन निधी, कर्जाची परतफेड आणि गुंतवणूक यांचा वाटा बाजूला काढा. उरलेली रक्कमच खरेदीचं बजेट, आणि खरेदी त्यानुसारच.
  • खरेदीची यादी घरीच बनवा. यादीबाहेरची वस्तू कार्टमध्ये किमान 24 तास तशीच ठेवा. बिलिंगला जाण्याआधी ट्रॉलीतली प्रत्येक वस्तू यादीशी ताडून पाहा.
  • मेंबरशिप, कूपन किंवा फुकट सॅम्पल यांपैकी कशाचीही परतफेड खरेदीने करायची नसते.
  • डिस्काउंट टक्केवारी ऐवजी खिशातून प्रत्यक्ष किती रुपये जाणार, एवढाच आकडा पाहा.
  • मोठ्या खरेदीपूर्वी किमान दोन नकारात्मक रिव्ह्यू आवर्जून वाचा.
  • बजेटबाहेरची वस्तू ट्रायल रूममध्ये नेऊच नका.

या दिवाळीत खरेदी जरूर करा, पण निर्णय तुमचा असू द्या, चाणाक्ष मार्केटिंगचा नाही. आकाश दिवे लावायचे आहेत, खिशाला आग नाही!

गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यजातं
परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन।अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्ते-र्भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः॥ – भर्तृहरी, नीतिशतक
काम चांगले असो वा वाईट, शहाण्या माणसाने आधी त्याच्या परिणामाचा नीट विचार करावा. घाईघाईत केलेल्या कृतीचे फळ आयुष्यभर काट्यासारखे मनाला टोचत राहते.

अभिजीत कोळपकर
संपर्क : ९५०३०८२७७८

Read About : Hugging Face AI Agents Hack Debate: हगिंगफेस वाद
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.