John Wayne Glover : सिडनी हे ऑस्ट्रेलियाचं सर्वात सुंदर, गजबजलेलं आणि सुरक्षित मानलं जाणारं शहर होय. ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजसारख्या वास्तूंनी नटलेल्या या शहराच्या उत्तर किनाऱ्यावर ‘मोसमन’ नावाचा एक अत्यंत उच्चभ्रू, शांत आणि हिरवागार परिसर आहे. प्रशस्त रस्ते, सुंदर बागा आणि निवृत्त, श्रीमंत नागरिकांची वस्ती अशी या भागाची ओळख होती. १९८९ सालापर्यंत मोसमनमधलं जीवन अतिशय संथ आणि शांततेत सुरू होतं.
१ मार्च १९८९ ची सकाळ होती. ८२ वर्षीय ग्वेंडोलिन मिशेलहिल ही स्त्री मोसमनमधील एका इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी गंभीर जखमी अवस्थेत सापडली. तिच्या डोक्यावर मागून एखाद्या जड वस्तूने अत्यंत निर्घृणपणे प्रहार करण्यात आला होता. रुग्णालयात नेले असता काही तासांतच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की ही एक साधी चोरी किंवा अपघाताची घटना असावी, कारण तिच्याकडील काही पैसे गायब होते. पण, हल्ल्याची तीव्रता आणि क्रूरता पाहता हा केवळ चोरीचा उद्देश नसावा, अशी शंका तपासाधिकाऱ्यांच्या मनात डोकावत होती.
ग्वेंडोलिन ही अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाची वृद्धा होती. तिचं कोणाशीही शत्रूत्व नव्हतं. पोलीस तपासात मारेकऱ्याने कोणताही ठोस पुरावा मागे सोडला नसल्याचं लक्षात आलं. मोसमनसारख्या सुरक्षित भागात दिवसाढवळ्या एका वृद्धेची अशी हत्या झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली. पण, ही तर केवळ एका भयंकर पर्वाची सुरुवात होती.
पहिल्या हत्येनंतर अवघ्या दोन महिन्यांनी, ९ मे १९८९ या दिवशी मोसमनमध्येच दुसरी घटना घडली. ८४ वर्षीय लेडी विनिफ्रेडा ॲश्टन हिचा मृतदेह तिच्याच घराच्या परिसरात सापडला. तिच्यावरही ग्वेंडोलिन प्रमाणेच मागून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता आणि तिच्या डोक्यावर हातोड्यासारख्या वस्तूने वार करण्यात आले होते.
जेव्हा पोलिसांनी या दोन्ही हत्यांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोन्ही प्रकरणांमध्ये एक भयंकर साम्य आहे. दोन्ही बळी या ८० वर्षांवरील वृद्ध महिला होत्या, दोन्ही हत्या मोसमनसारख्या श्रीमंत भागात दिवसा झाल्या होत्या, हल्ल्याची पद्धत सारखीच होती आणि मृतदेहांची विटंबना करण्याचा किंवा त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा उद्देश दुय्यम वाटत होता. मुख्य उद्देश केवळ हत्या हाच होता. या साम्यामुळे सिडनी पोलिसांची झोप उडाली. हे काम कोणत्याही सामान्य गुन्हेगाराचं नसून एका विकृत ‘सीरियल किलर’चं आहे यावर शिक्कामोर्तब झालं.
मीडियाला जेव्हा या तपासाची कुणकुण लागली, तेव्हा त्यांनी या अज्ञात मारेकऱ्याला ‘द ग्रॅनी किलर’ असं नाव दिलं. त्यानंतर नोव्हेंबर १९८९ मध्ये ७३ वर्षीय मार्गारेट हॅरिस या वृद्धेची हत्या झाली. सिडनी शहरात, विशेषत: मोसमन परिसरात आता दहशतीचं वातावरण होतं. वृद्ध महिलांनी एकट्याने घराबाहेर पडणं बंद केलं होतं.
‘द ग्रॅनी किलर’ला पकडण्यासाठी सिडनी पोलिसांनी एक विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. पोलिसांनी हजारो लोकांची चौकशी केली. संशयितांची रेखाचित्रं प्रसिद्ध केली, पण पोलिसांना नेमकी दिशा सापडत नव्हती. तसंच १९९० च्या दशकात डीएनए तंत्रज्ञान आजच्याइतकं प्रगत नव्हतं, त्यामुळे घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून थेट गुन्हेगारापर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. द ग्रॅनी किलर अत्यंत हुशार होता. तो कधीही स्वत:चे बळी आधी ठरवत नसे. तो मोसमनच्या रस्त्यांवर फिरायचा आणि एखादी वृद्ध स्त्री एकटी दिसली की क्षणाचाही विलंब न लावता तिच्यावर हातोड्याने हल्ला करायचा. त्याच्या या वागण्यामुळे पोलिसांना त्याचा पुढचा बळी कोण असेल किंवा तो कुठे हल्ला करेल, याचा अंदाज बांधणं अशक्य झालं होतं.
बघता बघता १९९० साल उजाडलं, पण मोसमनची दहशत कमी झाली नव्हती. मार्च १९९० हा महिना सिडनीच्या इतिहासातील सर्वात काळा महिना ठरला. १९ मार्च १९९० या दिवशी एकाच दिवसात ग्रॅनी किलरने भयंकर उच्छाद मांडला. २० मार्च १९९० या दिवशी ६० वर्षीय जोन सिंक्लेअर हिची ग्रॅनी किलरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर तो तिथेच थांबला. नेमकं पोलिसांचं एक पथक संशयित म्हणून त्याच्या घरावर आणि हालचालींवर लक्ष ठेवून होतंच. पोलिसांनी जेव्हा त्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. जोन सिंक्लेअरचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडला होता आणि बाथरूममध्ये ग्रॅनी किलरने स्वत:चं मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तत्परतेने त्याला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
जेव्हा पोलिसांची चौकशी सुरू झाली, तेव्हा ग्रॅनी किलरचं नाव जॉन वेन ग्लोव्हर असल्याचं समजलं. ज्याच्या नावाने संपूर्ण सिडनी शहर थरथर कापत होतं, तो ग्रॅनी किलर एक ५७ वर्षांचा अत्यंत साधा, हसतमुख आणि सभ्य दिसणारा मनुष्य होता. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने अत्यंत शांतपणे, कोणताही पश्चात्ताप न दाखवता, एकापाठोपाठ एक सहा खून कसे केले याचं वर्णन केलं. पोलिसांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्याचा आवाज इतका सामान्य होता, जणू काही तो बाजारातून आणलेल्या वस्तूंची यादी वाचत असावा.
ग्लोव्हरचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. नंतर तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. ग्लोव्हरच्या या हिंसक प्रवृत्तीची पाळंमुळं त्याच्या बालपणात दडलेली होती. त्याच्या आईशी त्याचे संबंध अतिशय क्लेशदायी होते. त्याच्या आईने त्याला सतत दुय्यम वागणूक दिली होती. वृद्ध श्रीमंत आणि स्वतंत्र राहणाऱ्या स्त्रियांबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग आणि तिरस्कार खदखदत होता. जेव्हा त्याच्या आयुष्यात तणाव निर्माण व्हायचा, तेव्हा तो हा राग अनोळखी वृद्ध स्त्रियांवर काढायचा. त्याचा हा राग इतका विकृत होता की त्यांच्या हत्येनंतर त्याला एक प्रकारची मानसिक शांती मिळायची.
ऑस्ट्रेलियात तो बेकरी पदार्थ विकायचा व्यवसाय करत असे. व्यवसायाच्या निमित्ताने त्याचं मोसमन आणि आसपासच्या भागात सतत फिरणं व्हायचं. ग्लोव्हर विवाहित होता आणि त्याला दोन मुलीही होत्या. लोक त्याला एक चांगला शेजारी आणि प्रेमळ माणूस म्हणून ओळखत असत. वृद्ध लोकांशी तो अत्यंत आदराने वागायचा, त्यांना मदत करायचा. त्याचा हाच ‘सज्जनपणाचा’ मुखवटा त्याचं सर्वात मोठं हत्यार होतं.
१९९१ मध्ये सिडनीच्या न्यायालयात जॉन वेन ग्लोव्हरवर खटला उभा राहिला.
हा खटला पाहण्यासाठी कोर्टाबाहेर मोठी गर्दी उसळली होती. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला ‘मानसिक आजारी’ ठरवून शिक्षेत सूट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सरकारी वकिलांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की ग्लोव्हरला तो काय करत आहे याची पूर्ण जाणीव होती. त्याने प्रत्येक हत्या पूर्ण विचारांती आणि थंड डोक्याने केली होती. न्यायमूर्तींनी या गुन्ह्यांची भीषणता पाहता त्याला कधीही पॅरोल न मिळण्याच्या अटीवर सलग सहा जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तुरुंगात असताना ग्लोव्हरने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर, ९ सप्टेंबर २००५ या दिवशी तुरुंगातच गळफास लावून आपलं आयुष्य संपवण्यात त्याला यश मिळालं. अशा रीतीने एका क्रूर सीरियल किलरचा अंत झाला.
सिडनीच्या मोसमन परिसराने पुन्हा एकदा आपली पूर्वीची शांतता मिळवली, पण १९८९-९० या काळात ज्या वृद्ध स्त्रियांना अकारण आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या आठवणींचे आणि दहशतीचे व्रण त्या शहराच्या मानसिकतेवर कायमचे कोरले गेले.
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Read About : Lawrence Bishnoi gang and Indian underworld : अंडरवर्ल्डला वेळीच संपवायला हवं
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.