केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांचा अभिनव शोध; सुमारे ९४० रुपयांच्या ऑप्टिकल सेन्सरमुळे स्मार्टवॉच आणि वेअरेबल आरोग्य उपकरणांमध्ये क्रांतीची शक्यता
लंडन : Wearable Glucose Monitoring Technology – रक्तातील साखर तपासण्यासाठी वारंवार बोटाला टोचण्याची गरज भविष्यात संपुष्टात येऊ शकते. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक आणि त्यांच्या संशोधन गटाने स्थापन केलेल्या ‘ग्लिटरइन टेक’ या स्टार्टअपने अवघ्या १० डॉलर खर्चाची (सुमारे ९४० रु.) अत्याधुनिक ऑप्टिकल सेन्सर प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे अख्खी वैद्यकीय प्रयोगशाळाच तुमच्या मनगटावर येणार आहे.
प्र्रयोगशाळेतील अचूकतेच्या जवळ जाणारी मोजमापे देण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानामुळे स्मार्टवॉच आणि परिधान करता येण्याजोग्या (वेअरेबल) आरोग्य उपकरणांमध्ये मोठे परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. या उपकरणाला ‘कॉन्व्होल्यूशनल स्पेक्ट्रोमीटर’ असे म्हटले जाते. प्रकाशाचा वापर करून एखाद्या पदार्थाची रासायनिक रचना आणि त्यातील घटकांची माहिती मिळवणे, हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पारंपरिक स्पेक्ट्रोमीटर आकाराने मोठे आणि महाग असतात. त्यांची छोटी आवृत्ती तयार करताना अचूकता कमी होण्याची समस्या जाणवते. नव्या तंत्रज्ञानामुळे ही मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संशोधकांनी सिलिकॉन नायट्राइड फोटोनिक प्लॅटफॉर्म आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या साहाय्याने हे उपकरण तयार केले आहे. ते प्रकाशाच्या १२०० ते १७०० नॅनोमीटर तरंगलांबीच्या पट्ट्यात काम करते. एका सेकंदापेक्षा कमी वेळेत मोजमाप गोळा करून त्याचे विश्लेषण करता येते.
प्लास्टिकपासून कॉफीपर्यंत पदार्थांची तपासणी
संशोधनामध्ये प्लास्टिक, औषधे, कॉफी, पीठ आणि चहा यांसारख्या पदार्थांचे वर्गीकरण करताना १०० टक्के यश मिळाल्याचे संशोधकांनी नोंदवले. काही द्रावणांमधील घटकांचे प्रमाण मोजताना सुमारे ०.०१ टक्के अचूकताही साध्य झाली.
रक्त न टोचता आरोग्य तपासणीची शक्यता
त्वचेतील ओलावा, रक्तातील अल्कोहोल, लॅक्टेट आणि ग्लुकोज यांसारख्या जैविक घटकांचे मोजमाप करण्यासाठीही या उपकरणाची चाचणी घेण्यात आली. एका व्यक्तीवर दीर्घकाळ रक्तातील साखरेचे निरीक्षण करण्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.
प्रत्यक्ष वापरासाठी आणखी चाचण्या आवश्यक
हे तंत्रज्ञान आरोग्यसेवा, अन्नगुणवत्ता तपासणी, औद्योगिक नियंत्रण आणि पर्यावरण निरीक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, रक्तातील साखरेचे मोजमाप करण्यासाठी ते नियमित वैद्यकीय वापरात आणण्यापूर्वी मोठ्या गटांवर चाचण्या, सुरक्षिततेचे मूल्यमापन आणि नियामक मान्यता आवश्यक असेल. त्यामुळे सध्या हे संशोधन आशादायक असले, तरी पारंपरिक ग्लुकोज मॉनिटरचा पर्याय म्हणून त्याचा वापर करण्याची वेळ आलेली नाही.
Read About: Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.