Neem Trees Against Air Pollution : झाडे ही केवळ निसर्गाचा हिरवागार नजारा नाहीत, तर एका अर्थाने ती मानवी अस्तित्वासाठी लाईफलाईन आहेत. ती हिरवे कवच होऊन, ढाल होऊन आपल्याला प्रदूषणापासून वाचवतात, सृष्टीचक्राचा तोल सांभाळतात, पर्जन्यमान वाढवण्यास मदत करतात आणि जमिनीचा कस टिकवून ठेवतात. एक झाड म्हणजे एक संपूर्ण परिसंस्था असते. ते कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते, प्राणवायू देते, हवेतील धूलिकणांना आपल्या पानांवर रोखून ठेवते, तापमानाला नियंत्रित करते आणि असंख्य जीवांना आसरा देते. सूर्याच्या अतिनील किरणांना किंवा हानिकारक किरणांना अटकाव करून तापमान नियंत्रित करणे ही त्यांची रोजची, न थकता चालणारी कामे आहेत. संपूर्ण सृष्टीचक्राचा तोल या हिरवाईने सांभाळलेला आहे.
पण विडंबना अशी की, ज्या झाडांवर आपण प्रदूषणाशी लढण्याची जबाबदारी टाकतो, त्याच झाडांवर आज प्रदूषणाचा घाला पडत आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या एका वृक्षपाहणीतून या वास्तवावर प्रकाश पडला आहे. देशाची राजधानी आज वायुप्रदूषणाची राजधानी बनली आहे. तिथे हवेतील PM २.५ आणि PM १० चे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या कित्येक पट जास्त आहे. या विषारी हवेत दिल्लीतील अनेक झाडे आजारी पडली आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे की, सततच्या धुरामुळे आणि धुळीमुळे झाडांच्या पानांवर काजळीचा थर जमा होतो, त्यांची पर्णछिद्रे बंद होतात, त्यामुळे त्यांची प्रकाश-संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते, वाढ खुंटते, पाने गळू लागतात आणि काही वेळा झाडे वाळूनही जातात. विशेषत: पिंपळ, अशोक यांसारख्या संवेदनशील प्रजातींना याचा मोठा फटका बसला आहे.
झाड आजारी पडले तर सभोवतालची संपूर्ण परिसंस्थाच आजारी पडते. तरीही प्रदूषणाच्या या काळोख्या खाईत आशेचा एक किरण म्हणजे कडुनिंब. वैज्ञानिक निरीक्षणांनुसार, कडुनिंबाची पाने तुलनेने अधिक जाड, चिवट आणि तेलकट असतात. त्याच्यातील अझाडिरॅक्टीनसारखे नैसर्गिक घटक त्याला प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शक्ती देतात. कडुनिंब केवळ प्रदूषण सहनच करत नाही, तर हवेतील सल्फर डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडसारखे घातक वायू शोषून घेण्याची त्याची क्षमता इतर झाडांपेक्षा कितीतरी जास्त आहे. कमी पाण्यात, खराब जमिनीत आणि वाढत्या तापमानातही तो दिमाखात उभा राहतो, त्यामुळे तो केवळ एक झाड न राहता, प्रदूषणाविरुद्धचा एक हिरवा योद्धा बनला आहे.
यातून एक महत्त्वाचा धडा शिकण्यासारखा आहे – प्रदूषणाशी लढताना झाडांची योग्य निवड आवश्यक असते. केवळ झाडे लावा, हा मंत्र आता पुरेसा नाही. कोणती झाडे लावायची, कुठे लावायची याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. रस्त्याच्या कडेला धूळ रोखणारी, दाट पानांची झाडे, औद्योगिक परिसरात वायू प्रदूषक शोषणारी कडुनिंब, शिरीष, पेल्टोफोरमसारखी झाडे; तर निवासी भागात घनगर्द सावली आणि ऑक्सिजन देणारी झाडे लावणे गरजेचे आहे. स्थानिक, देशी प्रजातींचा वापर वाढवला पाहिजे. विदेशी शोभेच्या झाडांपेक्षा आपल्या मातीतील वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, जांभूळ ही झाडे पर्यावरणासाठी अधिक उपयुक्त आहेत.
दुसरे म्हणजे झाड लावणे ही घटना नाही तर ती एक प्रक्रिया आहे. झाड लावून फोटो काढण्यापेक्षा ते जगवणे महत्त्वाचे आहे. आज अनेक वृक्षारोपण मोहिमा केवळ आकडेवारीसाठी होतात. पाच वर्षांनंतर त्यातली किती झाडे जगली याचा हिशेब कोणीच ठेवत नाही. झाडांना पाणी, संरक्षण आणि मोकळा श्वास मिळाला पाहिजे. काँक्रिटमध्ये गाडलेली, जाहिरातींच्या खिळ्यांनी जखमी झालेली झाडे, रासायनिक इंजेक्शने देऊन मारलेली झाडे प्रदूषणाशी काय लढणार? शेवटी, हा प्रश्न केवळ वन खात्याचा किंवा सरकारचा नाही. ही झाडे वाचली तर पर्यावरण वाचेल आणि पर्यायाने मानवही तग धरू शकेल, हे भान प्रत्येक नागरिकाने ठेवले पाहिजे. झाड आपल्याला फुकट ऑक्सिजन देते म्हणून त्याची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा दिल्लीसारखी परिस्थिती प्रत्येक शहरात येईल, तेव्हा ऑक्सिजन सिलेंडरसाठी रांगा लावण्यापेक्षा आजच एका झाडासाठी रांगेत उभे राहणे केव्हाही चांगले, म्हणून विकासाच्या नावाखाली सुरू असलेली झाडांची कत्तल थांबवून, प्रदूषण सहन करू शकणाऱ्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या झाडांची वैज्ञानिक पद्धतीने लागवड करणे हीच काळाची गरज आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा केवळ एक नारा नसून पृथ्वीवर जीवन टिकवून ठेवण्यासाठी असलेली आजची सर्वात मोठी गरज आहे हे मानवाने लक्षात घेण्याची गरज या अभ्यासामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वाढते शहरीकरण, रस्ते, प्रकल्प, कारखाने आणि इतर विविध कारणांमुळे झाडांवर कुऱ्हाडी चालवल्या जातात. त्याचप्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाचे प्रयत्नही सुरू असतात, पण अशा वृक्षतोडीमुळे जगभर पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. जंगलराजी नष्ट होत चालल्यामुळे पृथ्वीचे हिरवे कवच कमी होत चालले असून तापमान वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका तीव्रतेने जाणवायला लागला आहे. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस हे त्याचेच परिणाम आहेत. झाडांशिवाय मानवी भविष्याची कल्पना करणेही अशक्य आहे, म्हणूनच आता केवळ झाडे लावण्यापेक्षा, योग्य झाड निवडून ते जगवण्याचा संकल्प करूया. कडुनिंबाने दाखवलेल्या मार्गावर चाललो तरच आपण या प्रदूषणाच्या युद्धात जिंकू शकू आणि भावी पिढ्यांसाठी एक श्वास घेण्यायोग्य सृष्टी मागे ठेवू शकू.
Read About : India defence procurement : सज्जतेचे सामर्थ्य!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.