Ad Advertisement Ad Advertisement

Muhurat Trading 2026 – मुहूर्त ट्रेडिंग : शुभारंभ नव्या आर्थिक संकल्पांचा !

Muhurat Trading 2026 : भारतीय संस्कृतीत दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा सण नाही, तर नव्या सुरुवातीचा आणि समृद्धीचा उत्सव आहे. भारतीय शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्राला विशेष महत्त्व असते. या विशेष सत्रात बहुतांश गुंतवणूकदार उत्साहाने सहभागी होतात. मात्र, शुभ मुहूर्तासोबत आर्थिक शिस्त आणि योग्य विश्लेषण यांची जोड दिली, तरच गुंतवणुकीचा प्रवास अधिक सुजाण होऊ शकतो.

दिवाळीचा सण म्हणजे नव्या सुरुवातीचा, समृद्धीचा आणि शुभलाभाचा उत्सव! याच शुभमुहूर्तावर शेअर बाजारातही मुहूर्त ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीचा श्रीगणेशा केला जातो. सांस्कृतिक परंपरेला आर्थिक नियोजनाची जोड देणाऱ्या या विशेष सत्रात गुंतवणूकदार मर्यादित वेळेत शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी अनेक नवोदित गुंतवणूकदार या मुहूर्ताला पसंती देतात. मात्र, शुभमुहूर्तावर केलेली गुंतवणूक खऱ्या अर्थाने फलदायी ठरवायची असेल, तर केवळ परंपरेपुरते व्यवहार न करता योग्य नियोजन आणि गुंतवणुकीचा दीर्घकालीन दृष्टिकोन यांना प्राधान्य देणे गरजेचे असते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ८ नोव्हेंबर २०२६ (रविवार) रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे हे विशेष सत्र पार पडेल. इक्विटी विभागातील प्री-ओपन सत्र दुपारी २.०५ ते २.२० या वेळेत, तर नियमित मुहूर्त ट्रेडिंग सत्र दुपारी २.२० ते ३.३० या वेळेत होणार आहे. या विशेष सत्रात होणाऱ्या शेअर खरेदी-विक्री व्यवहारांना नेहमीप्रमाणे लागू असलेले सेटलमेंटचे नियम बंधनकारक असतील.

शेअर बाजाराचा वर्षभराचा आढावा

मागील वर्षाच्या (२१ ऑक्टोबर २०२५) मुहूर्त ट्रेडिंगपासून ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या कालावधीकडे पाहिले, तर भारतीय शेअर बाजारासाठी हा काळ आव्हानात्मक ठरल्याचे दिसते. वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात अंदाजे १३ टक्के घसरण झाली. मात्र, निर्देशांकातील घसरण म्हणजे प्रत्येक समभागात घसरण झाली असे नाही. वर्षभरात प्रमुख निर्देशांकात सहभागी असणाऱ्या इटर्नल, टेक महिंद्रा, अदानी पोर्टस् आणि टायटन कंपनीच्या शेअर किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

पण, याच कालावधीत (वर्षभरात) आयटीसी, श्रीराम फायनान्स आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. याबाबत नमूद करण्याचे मुख्य कारण असे की, दरवर्षी नामांकित कंपन्यांच्या शेअर किमतीत वाढ होत नसते. कंपनीची आर्थिक कामगिरी, उद्योगातील स्पर्धा आणि व्यवसाय दृष्टीने आंतरराष्ट्रीय बाजारातील अपेक्षा यांचा शेअर किमतीवर परिणाम होत असतो. तात्पर्य, इक्विटी (शेअर)मधील गुंतवणूक दरवर्षी उत्तम परताव्याची हमी देत नाही.

फंडामेंटल आणि टेक्निकल विश्लेषण महत्त्वाचे

शेअर बाजारात गुंतवणूक करताना शुभ वेळेपेक्षा योग्य निर्णयाला अधिक महत्त्व असते. एखाद्या कंपनीचे शेअर गुंतवणूक दृष्टीने खरेदी करत असताना कंपनीचा व्यवसाय, आर्थिक कामगिरी, नफ्यातील वाढ, कर्जाचे प्रमाण, व्यवस्थापनाची गुणवत्ता आणि भविष्यातील विकासाच्या संधी यांचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीची विक्री आणि नफा सातत्याने वाढत असेल, कर्जाचे प्रमाण नियंत्रणात असेल आणि तिच्या व्यवसायाला भविष्यात चांगल्या संधी असतील, तर त्या कंपनीचे शेअर दीर्घकाळ गुंतवणूक स्वरूपात खरेदी करावेत. परंतु, उत्तम व्यवसाय विस्तार करत असलेल्या कंपनीच्या शेअर किमतीत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यास नफा वसुलीमुळे शेअर किमतीत अचानक घसरण येण्याची शक्यता वाढते, त्यामुळे शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक व्यक्तीने फंडामेंटल आणि टेक्निकल विश्लेषणाला समान महत्त्व देणे गरजेचे असते.

शुभ मुहूर्तासोबत विवेकाची जोड

आपल्याला मूलभूत विश्लेषणातून कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायाची गुणवत्ता, नफा, प्रति समभाग उत्पन्न (अर्निंग पर शेअर), किंमत-उत्पन्न गुणोत्तर (प्राईझ-अर्निंग रेश्यो) आणि भविष्यातील वाढीच्या शक्यता समजून घेता येतात. उदाहरणार्थ, कंपनीचा व्यवसाय मजबूत स्थितीत आहे का? आणि कंपनीच्या शेअर किमतीचे सध्याचे मूल्य योग्य आहे का? याचा अंदाज घेता येतो. तांत्रिक विश्लेषणाद्वारे शेअर किमतीमधील चढ-उतार, दर दिवसाला होणारे एकूण शेअर व्यवहारांचे (खरेदी-विक्री) प्रमाण, शेअर किमतीमधील चढउतार (सपोर्ट आणि रेझिस्टन्स) यांचा अभ्यास करता येतो. मात्र, एक मुद्दा आवर्जून नमूद करत आहे; तांत्रिक विश्लेषणाद्वारे भविष्यातील शेअर किमतीमधील वाढीची खात्री देता येत नाही. तात्पर्य, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एखाद्या कंपनीच्या शेअर किमतीत वाढ होताना दिसत आहे म्हणून शेअर खरेदी करणे टाळावे. शेअर खरेदी किंवा विक्रीच्या निर्णयामागे (अभ्यास) स्पष्ट कारण असावे.

नव्या संवत्सराचा आर्थिक संकल्प

गुंतवणूकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगपासून वर्षभरासाठी काही संकल्प करावेत. यामध्ये नियमित बचत करणे, आपत्कालीन निधी उभारणे, आरोग्य आणि जीवन विमा संरक्षण घेणे, कर्जाचे नियोजन करणे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करण्यास विशेष प्राधान्य द्यावे.
शेअर स्वरूपात गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार छोटी रक्कम बाजूला ठेवून अभ्यासाला सुरुवात करावी. इक्विटी पोर्टफोलिओ तयार करताना गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घेऊन योग्य कंपन्यांचे शेअर खंडाखंडाने विकत घ्यावे. त्याचसोबत म्युच्युअल फंड योजनेत दरमहा गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे.

गुंतवणूक समुपदेशन

गुंतवणूकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर खरेदी (गुंतवणुकीची सुरुवात) करणे ही चांगली गोष्ट आहे; परंतु केवळ शुभ मुहूर्तामुळे नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. बाजारातील चढ-उतार, कंपनीची आर्थिक स्थिती, गुंतवणुकीचा कालावधी आणि आर्थिक जोखीम सहन करण्याची क्षमता यांचा विचार करणे आवश्यक आहे.

या दिवाळीत लक्ष्मीपूजनासोबत आर्थिक शिस्तीचे पालन करण्याची सुरुवात करावी. इक्विटी (शेअर) गुंतवणूक पर्यायाची निवड केल्यावर अफवांऐवजी अभ्यास, भावनांऐवजी विवेक आणि झटपट नफ्याच्या अपेक्षेऐवजी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना महत्त्व द्यावे. कारण खऱ्या अर्थाने समृद्धीचा मार्ग केवळ शुभ मुहूर्तातून नव्हे, तर सातत्यपूर्ण आर्थिक नियोजनातून निर्माण होतो.

कौस्तुभ खोरवाल

Read About : Why Humans Swear : शिव्यांची लाखोली
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.