जागा उपलब्ध होताच उभारणीला वेग देणार- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
महाराष्ट्रात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान उभारण्याचीही संधी; २२ प्रस्तावांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : Ayush Hospital Land Issue- छत्रपती संभाजीनगर येथील प्रस्तावित आयुष रुग्णालयाच्या जागेवरून सुरू असलेला वाद अद्याप कायम आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कळविण्यात आले असून, राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार जागा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाला वेग येईल, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुख्मिणी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्ताने राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आयुष रुग्णालय, महाराष्ट्रातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, तसेच देशातील आयुष क्षेत्राच्या विस्ताराबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
जागेअभावी आयुष रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित
संभाजीनगरमध्ये जिल्हास्तरीय आयुष रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर रुग्णालय उभारणीला गती मिळेल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. राज्यात एम्स उभारण्याची मागणी होत असतानाच केंद्र सरकारने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशात तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना जाधव म्हणाले की, दिल्ली आणि गोवा येथे यापूर्वीच आयुर्वेद संस्थान सुरू झाले आहेत. नव्याने प्रस्तावित संस्थानांपैकी तिसऱ्या संस्थेसाठी देशभरातील राज्यांकडून २२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. संबंधित राज्यांचे प्रेझेंटेशनही झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, महाराष्ट्राचे प्रेझेंटेशन पूर्ण झाले आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. कोणत्या राज्याला हे संस्थान द्यायचे, हे पंतप्रधानांच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानांची घोषणा करण्यात आली असून, आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि प्रगत आरोग्यसेवा विस्तारण्याचा यामागील उद्देश आहे.
देशात १० आयुर्वेद संस्थान उभारण्याचे उद्दिष्ट
देशात आयुर्वेद संस्थानांची संख्या वाढविण्याबाबतही जाधव यांनी माहिती दिली. देशभरात एकूण १० अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी तीन संस्थानांची उभारणी यावर्षी करण्याचे नियोजन असून, पुढील टप्प्यात आणखी सात संस्थानांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे आयुर्वेद क्षेत्रात उच्च शिक्षण, संशोधन, कुशल मनुष्यबळ आणि रुग्णांना आधुनिक पद्धतीने उपचार उपलब्ध करून देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
मानसिक तणाव, हृदयविकार आणि कर्करोग नियंत्रणासाठी आयुषचा पुढाकार
आयुष क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत असून, उपचार पद्धतींसोबतच नवीन कौशल्ये आणि संशोधनालाही महत्त्व दिले जात आहे. मानसिक तणाव, हृदयविकार, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयुष विभाग पुढाकार घेत असल्याचे जाधव यांनी सांगितले. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि विस्कळीत दिनचर्या यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. आहार आणि दिनचर्या हे अनेक आरोग्य समस्यांमागील महत्त्वाचे घटक असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयुष विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या आयुषविषयक धोरणामध्ये पारंपरिक उपचार पद्धतींसोबत संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेतील समन्वयावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read About : IVF Center Sambhajinagar – अनेक दांपत्यांच्या अपत्यप्राप्तीच्या स्वप्नांना मिळणार नवी आशा!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.