Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Drought – दुष्काळामुळे मनुष्यप्राण्यांसह प्राणीमात्रांचीही जिवघेणी होरपळ !

सर्प, कोल्ह्यासह पशुपक्षी आढळले मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : Marathwada Drought सद्यस्थितीत छत्रपती संभाजी नगरसह संपूर्ण मराठवाड्यात अनेक भागांत दुष्काळाच्या झळा मनुष्यप्राण्यांसह वन्यजिवांना सोसाव्या लागत आहे. विभागात दुष्काळाची तीव्रता अधिक असून, काही वन्यजीव पाण्यावाचून तडफडत असून, काही मृत अवस्थेत आढळून आल्याचे वन्यजीव संरक्षकांनी ‘पुण्यनगरी’ ला सांगितले.

दै. पुण्यनगरीने ३ नोव्हेंबरच्या अंकात ‘जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची दखल घेवून वन्यजीव संरक्षकांनी गौताळा, सारोळा, अजिंठा आदी ठिकाणी पाहणी केली असता, पाण्याअभावी वन्यजीवांची होरपळ होत असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी सर्प, कोल्हा आणि काही पशुपक्षी घायाळ झाल्याचे दिसून आले.

उपाययोजना तोकड्या

आतापासून ही परिस्थिती असून, जानेवारीनंतर काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, वन विभाग उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया वन्यजीव संरक्षांनी व्यक्त केल्या आहेत. शेती पिकासाठी तर सोडा, परंतु पिण्यासाठी काही महिने पुरेल एवढेच पाणी सध्या शिल्लक आहे.

पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट

सध्या उपलब्ध पाणी आपल्याला पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार आहे. मनुष्याबरोबरच वन्यजीवांचे सुद्धा यामध्ये प्रचंड हाल होत असल्याचे दिसून आले आहे. पशुपक्षी, कीटक, सरीसृप, सस्तन प्राणी यांना सुद्धा सध्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. आधीच शहरांच्या बाजूने आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गांमुळे अनेक प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट झालेले आहेत. बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे अनेक जीव बेघर झालेले आहेत. डोंगरदऱ्यांपर्यंत वस्त्या विस्तारत गेल्याने या स्थानिक प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यात दुष्काळसदृश स्थितीची भर पडली आहे.

बहुतांश पाणवटे आटले

दरवेळी जानेवारी महिन्यानंतर जंगलातील, माळरानावरील, डोंगरदऱ्यांमधील चारापाणी संपत असतो. परंतु, ती वेळ आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच येऊन ठेपली आहे. सध्या ठिकठिकाणी, शहराच्या आसपास आपल्याला उन्हाळ्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. चारा-गवत सुकून चालले आहे. बहुतांश ठिकाणच्या पाणवठ्यांतील पाणीही आटले आहे. अनेक छोट्या-मोठ्या तलावांनी तर आताच तळ गाठल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्राण्यांचे नागरी वस्त्यांकडे आगमन

अशा शुष्क परिस्थितीत डोंगर-दऱ्या, जंगलांमध्ये राहणारे पशुपक्षी, प्राणी नागरी वस्त्यांकडे येणे सुरू झाले आहे. हरिण, रानडुक्कर, निलगाई यांसारखे तृणभक्षी प्राणी आता शेतवत्यांसह नागरी वस्त्यांमध्ये अन्न-पाण्याच्या शोधार्थ चालले आहेत. शेत-जमिनीमधील जी काही पिके आहेत, ती खाण्यासाठी ते येत आहेत. कारण त्यांच्या अधिवासात चारा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या पाठोपाठ त्यांना खाणारे बिबट, तरस, लांडगे, अजगर हे सुद्धा नागरी वस्त्यांकडे येणे सुरू झाले असून, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढणार आहे.
जंगलात पाणी कमी होत चालल्याने आता वनखात्याची जबाबदारी म्हणजे कन्नड तालुक्यातीली गौताळा अभयारण्य, पाटणादेवी, सारोळा, अजिंठा, म्हैसमाळ या वनक्षेत्रामध्ये जुने पाणवठे तसेच काही नवीन पाणवठे करून त्यात मुबलक पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

उपाययोजना करणे गरजेचे

शेतवस्त्यांकडे येणारे प्राणी बहुदा रात्री येतात आणि कठडे नसलेल्या विहिरीमध्ये पडतात. मग, त्यांची सुटका करण्यसाचे कार्य हाती घ्यावे लागते. अनेकदा विहिरीत बुडून प्राणी मरतात. नागरिकांची देखील जबाबदारीने आपल्या विहिरींना कठडे करून घेवून, पाण्याची नासाडी टाळावी. वनविभागाने देखील याप्रश्नी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील आणि गावखेड्यांतील नागरिकांनी अशा संकटसमयी थोडी भूतदया दाखवून वन्यप्राणी दिसून आल्यास तात्काळ वन्यजीव संरक्षक किंवा वन विभागांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
डॉ. किशोर पाठक, वन्यजीव संरक्षक

Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.