एमबीबीएस, बीडीएसच्या १३८ रिक्त जागांसाठी विशेष फेरी, ७ नोव्हेंबरपर्यंत पसंतीक्रम भरण्याची मुदत
छत्रपती संभाजीनगर: Mbbs Bds Special Stray Vacancy Round – वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या नियमित प्रवेश प्रक्रिया तसेच ऑनलाइन स्ट्रे व्हॅकन्सी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील महाविद्यालयांमध्ये १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) तीन विशेष ऑनलाइन स्ट्रे व्हॅकन्सी फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे अद्याप वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संधी मिळणार आहे.
या विशेष प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी जागावाटपाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून निर्धारित मुदतीत आपली पसंती नोंदविणे आवश्यक आहे.
एमबीबीएसच्या ८४, तर बीडीएसच्या ५४ जागा रिक्त
राज्यात रिक्त असलेल्या एकूण १३८ जागांमध्ये एमबीबीएसच्या ८४, तर बीडीएसच्या ५४ जागांचा समावेश आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी खासगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३९, तर खासगी वैद्यकीय विद्यापीठांमध्ये ४५ जागा रिक्त आहेत. बीडीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये दोन, खासगी महाविद्यालयांमध्ये २२ आणि खासगी विद्यापीठांमध्ये ३० जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, नियमित प्रवेशाच्या तीन फेऱ्या आणि त्यानंतरच्या ऑनलाइन स्ट्रे व्हॅकन्सी फेऱ्या पूर्ण होऊनही या जागा रिक्त राहिल्याने सीईटी सेलने विशेष प्रवेश फेऱ्यांचे आयोजन केले आहे. त्यामुळे एमबीबीएस किंवा बीडीएसला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांनुसार पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळणार आहे.
जागा वाटपाचा निकाल ८ नोव्हेंबरला
सीईटी सेलने बुधवारी (दि.४) रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध जागा, महाविद्यालय आणि अभ्यासक्रम यांचा विचार करून ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरावेत. जागावाटपाचा निकाल ८ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक मूळ कागदपत्रे आणि प्रवेश शुल्कासह १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रवेश शुल्क आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट (डीडी) किंवा एनईएफटीद्वारे भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?
विशेष प्रवेश फेरी ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रिक्त जागांची अधिकृत यादी काळजीपूर्वक तपासावी. आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध महाविद्यालयांचा विचार करून पसंतीक्रम भरावेत. ऑनलाइन अर्जातील माहिती अचूक असल्याची खात्री करावी. जागा वाटपानंतर आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काची व्यवस्था आधीच करून ठेवावी, जेणेकरून प्रवेश निश्चित करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
Read About : Government Medical College Staff Discipline Rules – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.