Ad Advertisement Ad Advertisement

AI Hallucination in Research Papers : एआयच्या चुकीमुळे वैज्ञानिक शोधनिबंधांमध्ये बनावट संदर्भांचा सुळसुळाट; संशोधन क्षेत्रासमोर नवे संकट

२०२३ ते २०२६ या कालावधीतील सुमारे ५ लाख वैज्ञानिक शोधनिबंधांच्या तपासणीत बनावट संदर्भांचा मुद्दा समोर आल्याचा दावा

नवी दिल्ली : AI Hallucination in Research Papers वैज्ञानिक संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विश्वासार्हतेला तडे देणारी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. विज्ञान क्षेत्रातील शोधनिबंधांमध्ये बनावट संदर्भ देण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत जगभरात प्रकाशित झालेल्या सुमारे ५ लाख वैज्ञानिक शोधनिबंधांची कसून तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मानवाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा झालेला अतिवापर आणि संशोधकांचे गैरवर्तन कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एआय हॅलुसिनेशनचा फटका

सध्याच्या काळात शोधनिबंध लिहिण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी अनेक संशोधक चॅटजीपीटी सारख्या प्रगत एआय टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र, तंत्रज्ञानाच्या भाषेत ज्याला एआय हॅलुसिनेशन म्हटले जाते, त्याचा फटका या संशोधनाला बसत आहे. अनेकदा एआय विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना किंवा संदर्भ देताना अत्यंत हुबेहूब वाटणारे, परंतु प्रत्यक्षात पूर्णपणे काल्पनिक असलेले लेखक, पुस्तके, आणि नामांकित सायन्स जर्नल्सची नावे स्वत:च तयार करते.

मानवी निष्काळजीपणा आणि गैरवर्तन

हा घोळ केवळ एआयच्या चुकीमुळे झालेला नाही, तर संशोधकांच्या आंधळ्या विश्वासामुळे आणि निष्काळजीपणामुळे वाढला आहे. करिअरमधील प्रगतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांच्या दबावापोटी कमी वेळेत जास्तीत जास्त शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या शर्यतीत संशोधकांनी एआयने दिलेले संदर्भ स्वत: क्रॉस-व्हेरिफाय (तपासणी) न करता जसेच्या तसे वापरले. मानवाच्या या बेजबाबदार वर्तनामुळे हजारो बनावट संदर्भ अधिकृत सायन्स पेपर्सचा भाग बनले.

वैज्ञानिक जगतासमोरील मोठे संकट

कोणतेही नवीन वैज्ञानिक संशोधन हे आधीच्या संशोधनांच्या आधारावर आणि संदर्भांवर उभे असते. जर हे पायाभूत संदर्भच खोटे किंवा अस्तित्वात नसलेले असतील, तर संपूर्ण विज्ञानाची इमारत ढासळू शकते. यामुळे चुकीच्या माहितीवर आधारित पुढील संशोधने होऊन मानवी विकासाला खीळ बसण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

भविष्यातील उपाययोजना

या वाढत्या धोक्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सायन्स जर्नल्सनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एआय जनरेटेड बनावट संदर्भ आणि साहित्य चोरी ओळखण्यासाठी प्रगत सॉफ्टवेअर्स विकसित केली जात आहेत. यापुढे शोधनिबंधांमधील प्रत्येक संदर्भाची कठोर तपासणी केली जाणार असून, एआयचा अनिर्बंध वापर थांबवण्यासाठी नियमावली कडक केली जात आहे.

Read About : Education Department Inspects 517 Private Schools- पटसंख्येच्या बनवाबनवीला शिक्षण विभागाचा दणका!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.