Ad Advertisement Ad Advertisement

Breast Cancer Awareness Program – स्तनाच्या कर्करोगाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार

स्तनाच्या आरोग्याबाबत १८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर : Breast Cancer Awareness Program – स्तनाचा कर्करोग हा वेळीच ओळखल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. मात्र, लक्षणांकडे दुर्लक्ष आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अनेकदा निदानास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन स्तनाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात १८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, स्तनांच्या आरोग्याची काळजी घेणे, लवकर निदानाचे महत्त्व समजून घेणे आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचे तज्ज्ञ डॉ. आशुतोष तोंडारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्तनांमध्ये जाणवणाऱ्या गाठी, असामान्य बदल किंवा इतर संशयास्पद लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमितपणे स्वत:च्या स्तनांमधील बदलांविषयी जागरूक राहणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हे प्रतिबंधात्मक काळजीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्तन तपासणीच्या प्रतिकृतीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे स्तन तपासणी कशी करावी आणि असामान्य बदल कसे ओळखावेत, याची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विविध जनजागृतीपर उपक्रमांतूनही विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात आला. ‘जाणा, स्पर्शातून ओळखा, लक्षणे ओळखा आणि कृती करा’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाने स्तनाच्या आरोग्याविषयी मोकळेपणाने चर्चा करण्याची गरज अधोरेखित केली. योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्ला यांमुळे कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला. प्राध्यापिका निशा पी. गोविंदानी आणि ऋतुजा उकिर्डे यांनी संयोजन केले.

Read About : Government Medical College Staff Discipline Rules – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.