सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती; एकत्रीकरणाच्या चर्चेला तूर्त पूर्णविराम
मुंबई : NCP Merger Talks उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांच्या निधनानंतर आतापर्यंत विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही किंवा यासंदर्भात कोणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, अजित पवार असताना विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी स्वत: याबाबत आमच्याशी संवाद साधला होता. १७ जानेवारीला गोविंदबाग येथे झालेल्या चर्चेचा व्हिडीओही सर्वांसमोर आहे. त्यामुळे या घडामोडी कोणापासून लपलेल्या नव्हत्या. याबाबत आपण यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र अजितदादांच्या निधनानंतर काही दिवसांतच आपण या विषयावर पडदा टाकला.
पवार साहेबांना अनेक लोक भेटतात
माझा भाऊ गेला, विषय संपला. दादा होते, तोपर्यंत चर्चा होती. आम्ही काय करणार आहोत, हे जगाला माहीत होते, असेही त्या म्हणाल्या. पवार साहेबांना अनेक लोक भेटत असतात. त्यात नवीन किंवा वावगे काहीही नाही. अजित पवारांचा गट वेगळा झाला होता, तेव्हाही अनेक लोक पवार साहेबांना भेटत होते, असे सांगून त्या म्हणाल्या, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय घडामोडी सुरू आहेत, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत सुळे यांनी त्यावर भाष्य करणे टाळले.
अजितदादांना ब्लॅकमेल कोण करत होते?
रोहित पवारांचा सवाल
मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या काळात मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचा वापर करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच अजितदादांना ब्लॅकमेल कोण करत होते आणि त्यासाठी आदेश कुणाचे होते? असा सवालही त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याचा आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अजित पवार यांनी भाजपला कणभर देखील भीक घातली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार नाही,’ हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार असल्याची टीका त्यांनी केली. भाजपसोबत असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगतानाच ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचे राजकारण उभे आहे, अशा भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या विषयात बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Ajit Pawar Plane Crash Allegations – अजितदादांच्या अपघातामागे तटकरे? – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.