Ad Advertisement Ad Advertisement

Samruddhi Expressway Accident – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 22 हून अधिक वाहनांना दिली धडक, अनेक जण जखमी

बुलढाण्यातील दुसरबीडजवळ तळेगाव परिसरात अपघात; सात ते आठ वाहनांचा चुराडा

दुसरबीड (जि. बुलढाणा) – Samruddhi Expressway Accident समृद्धी महामार्गावर दुसरबीडनजीक तळेगाव परिसरात एक भीषण साखळी अपघात घडला. रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सुमारे २२ पेक्षा जास्त वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३२१ व्या किलोमीटरजवळ सकाळी एक टँकर उलटला होता. त्यातील भुकटी रस्त्यावर पसरल्याने सुरक्षिततेसाठी वाहतूक थांबवण्यात आली होती आणि टँकर हटवण्यासाठी पोलिसांनी अडथळे लावले होते. त्यामुळे महामार्गावर मागे वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. प्रवासी आपापल्या वाहनांत बसून रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत असतानाच, लोखंडी पट्ट्या घेवून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच ४० बीएल ४९१४) मागून या उभ्या रांगेला थेट धडक दिली.

या भीषण पहिल्या धडकेमुळे पुढील वाहने वेगाने पुढे ढकलली गेली आणि ती एकमेकांवर आदळून धडकेची मालिकाच सुरू झाली. या साखळी अपघातात सात ते आठ वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सकाळच्या अपघातामुळे आधीच खोळंबलेल्या वाहतुकीला या दुसऱ्या अपघाताचा मोठा फटका बसला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त वाहने बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

समोर वाहनांची रांग स्पष्ट दिसत असतानाही चालकाला ट्रक का थांबवता आला नाही, हा तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ट्रक चालकाने मद्यप्राशन केले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read About : Firecracker 30 Fire Incidents – फटाक्यामुळे कचरा, वाहने, झाडे आणि गॅलरी पेटली
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.