Ad Advertisement Ad Advertisement

Sans Campaign Pneumonia Prevention -चिमुकल्यांचा श्वास वाचविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला – 2026

न्यूमोनियाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सांस अभियान’ सुरू

छत्रपती संभाजीनगर : Sans Campaign Pneumonia Prevention – चिमुकल्यांचा प्रत्येक श्वास सुरक्षित राहावा, त्यांचे बालपण आजाराच्या सावटाखाली हरवू नये आणि न्यूमोनियामुळे कोणत्याही बालकाचा जीव जाऊ नये, या संवेदनशील उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘सांस अभियान’ सुरू करण्यात आले आहे. बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १२ नोव्हेंबरपासून या विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून फेब्रुवारी २०२७ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

लहान मुलांना होणारा न्यूमोनिया हा केवळ एक आजार नसून अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरतो. मात्र, या आजाराची लक्षणे वेळीच ओळखली आणि योग्य उपचार मिळाले, तर अनेक बालकांचे प्राण वाचू शकतात. हाच संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. अभियानांतर्गत बालकांचे संरक्षण, आजाराला प्रतिबंध आणि वेळेवर उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देणे, त्यानंतर वयानुसार पूरक आहार देणे, नियमित लसीकरण आणि जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा देणे याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच घरातील स्वच्छता राखणे, हात धुण्याची सवय लावणे आणि बालकांना धूर व वायुप्रदूषणापासून दूर ठेवण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

लसीकरणातून न्यूमोनियाला रोखण्याचा प्रयत्न

न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही (न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन) लसीकरणाचे महत्त्व पालकांना पटवून दिले जाणार आहे. नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार बालकांना लसीचे डोस देण्याबरोबरच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करणार आहे. बालकाला सतत खोकला येणे, श्वास वेगाने चालणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे किंवा दूध व अन्न घेण्यास त्रास होणे ही न्यूमोनियाची महत्त्वाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत बालकाची तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान आणि योग्य उपचार बालकाचा जीव वाचवू शकतात.

आरोग्य यंत्रणा पोहोचणार घराघरांत

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून गृहभेटी, माता बैठका, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस तसेच सोशल मीडिया, पोस्टर्स, व्हिडिओ संदेश आणि ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. बालकांचे नियमित लसीकरण पूर्ण करणे, योग्य पोषण देणे, स्वच्छता राखणे आणि आजाराची लक्षणे दिसताच उपचार घेणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. बालकांचा श्वास सुरक्षित राहिला, तरच त्यांचे बालपण आनंदी आणि निरोगी होईल. ‘न्यूमोनिया नाही तर बालपण सही’ हा संदेश घेऊन आरोग्य विभागाने पालक, कुटुंबीय आणि समाजातील प्रत्येक घटकाला या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Read About : Ghati Hospital Doctors – फुफ्फुसात अडकलेली सीताफळाची बी बाहेर काढून बालकाला दिले जीवदान
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.