Advertisement Advertisement

EV Battery Life : ईव्हीच्या बॅटरीला मिळणार दीर्घायुष्य

सुपरकॅपॅसिटरमुळे अचानक वेग बदलताना आणि ब्रेक लावताना बॅटरीवरील ताण होणार कमी

नवी दिल्ली : EV Battery Life इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढवण्यासाठी राउरकेलाच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) संशोधकांनी विकसित केलेल्या हायब्रिड ऊर्जा-साठवण प्रणालीला पेटंट मिळाले आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरीवर अचानक येणारा वीजप्रवाहाचा ताण कमी होऊन तिचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे.

ईव्हीमध्ये हजारो सेल्सपासून बनलेली बॅटरी वापरली जाते. शहरांमध्ये वारंवार ब्रेक लावणे, अचानक वेग वाढवणे किंवा कमी करणे यामुळे बॅटरीवर मोठा ताण येतो. या समस्येवर उपाय म्हणून संशोधकांनी बॅटरीसोबत उच्च ऊर्जा-घनतेचा सुपरकॅपॅसिटर जोडला आहे.
सुपरकॅपॅसिटर काही सेकंदांत चार्ज-डिस्चार्ज होऊ शकतो आणि दहा लाखांहून अधिक चार्जिंग सायकल्स हाताळू शकतो. त्यामुळे अचानक वाढणारी ऊर्जा गरज सुपरकॅपॅसिटर पूर्ण करतो आणि बॅटरीवरील ताण कमी होतो.

कमी घटक, अधिक कार्यक्षमता

एनआयटी राउरकेलाच्या संशोधन पथकाने विकसित केलेल्या प्रणालीमध्ये एकच कन्व्हर्टर, इंडक्टर आणि एक नियंत्रण प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक प्रणालींच्या तुलनेत घटकांची संख्या आणि गुंतागुंत कमी होते.

संशोधकांनी अचानक ब्रेक लावणे, वेग वाढवणे आणि कमी करणे अशा परिस्थितीत प्रणालीची चाचणी घेतली. चाचण्यांमध्ये ४८ व्होल्टचा स्थिर विद्युतदाब आणि बॅटरी विद्युत प्रवाहात सुरळीत बदल दिसून आले. ही प्रणाली २४ ते ६० व्होल्ट क्षमतेच्या इलेक्ट्रिक स्कूटर, मोटारसायकल, ई-रिक्षा, कार्गो ट्रायसायकल तसेच कॅम्पस आणि औद्योगिक वाहनांसाठी उपयुक्त ठरू शकते.