Ad Advertisement Ad Advertisement

Dhule family accident in Rajasthan – धुळ्याच्या पवार कुटुंबावर काळाचा घाला, 9 ठार

राजस्थानमध्ये खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन येताना भीषण अपघात

धुळे : Dhule family accident in Rajasthan राजस्थानमध्ये खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुराजवळ रविवारी (ता. २२) पहाटे भरधाव क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्यातील एका कुटुंबातील १६ जण क्रूझर (एम.एच.११ सीएल ३००५) गाडीतून राजस्थानला खाटू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. रविवारी पहाटे कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावरील शंभूपुरा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव क्रूझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझरच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनातील प्रवासी आत अडकले होते.

अपघाताची माहिती मिळताच कोटा शहर पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जखमींना तातडीने न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचाही समावेश आहे.

चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी वाहन चालवताना क्रूझर चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ट्रकचालक हारून याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते. तो ट्रकपासून काही अंतरावर उभा असतानाच भरधाव क्रूझरने ट्रकला धडक दिली. या धडकेच्या जोरामुळे तो सुमारे २० फूट दूर फेकला गेला. जवळपास दहा मिनिटांनी शुद्धीवर आल्यानंतर त्याने स्वत: पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच्या गुडघ्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.

मृतांमध्ये लहान मुलीचाही समावेश

या भीषण अपघातात उषाबाई सजन पवार (६०, रा. शांतीगीत नगर, धुळे), सुशीला बाबुलाल पवार (६५, रा. नवनाथ नगर, धुळे), कैलास भगवान पवार (४५, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि.धुळे), जान्हवी कैलास पवार (१३, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे), सजन दौलत पवार (७०, रा. शांतीगीत नगर, धुळे), अनिता कैलास पवार (४०, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे), बाबुलाल दौलत पवार (७३, नवनाथ नगर, धुळे), सान्वी गणेश पवार (६, रा. शांतीगीत नगर, धुळे) आणि माधुरी गणेश पवार (४५, रा. शांतीगीत नगर, धुळे) यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोटा येथे जखमींवर उपचार

या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांची नावे अशी – मनीषा शरद पवार (४१), मयुरी शरद पवार (२०), जगदीश कैलास पवार (१०), श्रीजीत गणेश पवार (४), शरद बाबुलाल पवार (४५), गणेश शरद पवार (३२).

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या कोटामध्ये झालेल्या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. दुर्दैवी अपघातात अनेकांचे जीव गेल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाल्याचे मोदी सोशल मीडिया ‘एक्स’वरून म्हणाले. मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Read About : Morgan Stanley Sensex Target 2027- डिसेंबर २०२७ पर्यंत सेन्सेक्स ९५ हजारांवर झेपावणार!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.