विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन
मुंबई : Mumbai Book Festival 2026 – राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवात लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ बालकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबईतील विविध शाळांमधील 1 हजार 800 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुश्री वेंकटेश यांच्या माध्यमातून ‘कलेतून कथाकथन’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यात 500 विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ई-पुस्तकालयाची ओळख आणि प्रश्नमंजुषा हा उपक्रम घेण्यात आला. यात 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन्स लिटरेचरचे संपादक दीप सैकिया यांनी दिली.
मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच विविध कला आणि ज्ञानाधारित उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
29 नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन
चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये विद्यार्थ्यांसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून गोष्टी सांगणे, मराठी लोकनृत्य, लेखकांशी संवाद, निबंध लेखन स्पर्धा, विज्ञानाच्या गमतीजमती, मातीची खेळणी बनविण्याची कार्यशाळा, सुलेखन, कथाकथन, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचा समावेश आहे.
असा असेल कार्यक्रम
याशिवाय 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल सरदार तरनजीत सिंग संधू यांच्यासोबत राजनैतिक चातुर्याविषयी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी ‘भेटा तुमच्या सुपरहीरोला’ या विशेष सत्रातून संवाद साधता येणार आहे.
27 नोव्हेंबर रोजी विज्ञानविषयक उपक्रम आणि मातीची खेळणी बनविण्याची कार्यशाळा, तर 28 नोव्हेंबर रोजी कथाकथन, सुलेखन आणि आंतरशालेय वादविवाद स्पर्धा होणार आहेत. 29 नोव्हेंबर रोजी संवादकौशल्य, प्रश्नमंजुषा आणि सजगता (माइंडफुलनेस) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.