Ad Advertisement Ad Advertisement

Khandoba Temple Status – सातारा गावातील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराला मिळणार ‘ब’ तिर्थक्षेत्राचा दर्जा

मनपा प्रशासन शासनाला पाठविणार सविस्तर प्रस्ताव : नगरसेविका घोडेले यांची सर्वसाधारण सभेत मागणी

छत्रपती संभाजीनगर : Khandoba Temple Status : श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांपैकी आठवे स्थान मानले जाणारे मंदिर हे शहरातील सातारा गाव येथील आहे. श्री क्षेत्र खंडोबा मंदिर हे हेमांडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर असून, याठिकाणी दरवर्षी यात्राही भरते. या तीर्थक्षेत्राचा धार्मिक आणि पर्यटनाच्यादृष्टिने विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळावा, म्हणून प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच याठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका अनिता घोडेले यांनी बुधवारी (दि.५) मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली.


पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळावा, असे पत्र शासनाला दिलेले आहे. या पत्राच्या अनुषंघाने शासनाच्या अवर सचिवांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) मनपा प्रशासनाला याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार मनपा प्रशानाने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी बुधवारी सर्वसाधारण सभेपुढे मांडला.

यावर चर्चेदरम्यान, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे., प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठवावा, असे नगरसेविका घोडेले म्हणाल्या. तसेच चंपाषष्ठीला (मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी) याठिकाणी मोठी यात्रा भरते. मोठ्या संख्येने या यात्रेला भाविक येतात. याठिकाणी पाणी, पथदिवे, रस्ते आदी सुविधा नसल्याने, भाविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावर महापौर राजेंद्र जंजाळ यांनी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

मंदिरात खंडोबाची स्वयंभू मूर्ती

सातारा गावातील श्री क्षेत्र खंडोबाच्या मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन १७६६ मध्ये जीर्णोध्दार केला आहे. मंदिराच्या गर्भगृहात कोरीव काम केलेले आहे. घोड्यावर स्वार खंडोबाची मोठी स्वयंभू मूर्ती मंदिरात आहे. हे मंदिर जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिरुप मानले जाते. खंडोबा मंदिराला धार्मिक महत्व असून, नवसाला पावणारे जागृत देवस्थान मानले जाते. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला हजारो भाविक विविध भागातून दर्शनासाठी येतात.

पायाभूत सुविधांसाठी मिळेल शासनाकडून निधी

तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळाल्यास, शासनाकडून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. या निधीतून रस्ते, वीजपुरवठा, पथदिवे, भक्त निवास, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे आदी विविध सुविधा विकसित करता येतात.

Read About : District Hospital Advanced X-Ray – जिल्हा रुग्णालयात 30 लाखांचे अत्याधुनिक एक्सरे मशीन
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.